घनश्याम केळकर, बारामती
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ज.मा. मोरे यांचे आज पहाटे निधन झाले. ज.मा. मोरे ही एक राजकीय व्यक्तिमत्व नसून ते एक सर्जनशील संयमी आणि समाजशील व्यक्तिमत्व होते. ज.मा. मोरे म्हणजे समाजाचा आवाज… ज.मा. मोरे म्हणजे शरद पवारांचे सखे आणि सोबती..! ज.मा. अप्पांविषयी सखे आणि सोबती या पुस्तकात एक लेख लिहिण्याचा योग आला होता. त्या लेखाची पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा करीत आहोत.
प्रसंग पहिला - इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक लागली. पवारसाहेब विरोधी पक्षात होते. त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान त्यांना राज्यपालांनी त्यांच्या बंगल्यावर चहापानासाठी बोलावले. सोबत एका कार्यकर्त्याला घेऊन साहेब गेले. राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा.
ते साहेबांना म्हणू लागले, शरद, हे लोकसभा लढविण्याचे काय ठरवले आहेस तू? महाराष्ट्र तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तू दिल्लीत जाण्याचा विचार कशासाठी करतो आहेस? त्यातून इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसच्या सहानुभूतीची लाट आहे. त्यात तू निवडून येशील का?
सगळे संभाषण इंग्रजीतून चालले होते. साहेब म्हणाले, या कार्यकर्त्याला समजावा.फफ राज्यपालांनी आपल्या पीएला बोलावले व सर्व संभाषण मराठीतून त्या कार्यकर्त्याला सांगायला सांगितले. शेवटी विचारले, साहेब निवडून येतील याबद्दल नवा पैसा जरी शंका असली तरी ही निवडणूक लढवू नका. कार्यकर्ता मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अहो नवा पैसा काय म्हणता? मी १०१ टक्के खात्री देतो, ही निवडणूक पवारसाहेबच जिंकणार.
प्रसंग दुसरा - हीच निवडणूक लढविण्याबाबत राज्यातील कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. साहेब सांगत होते, ही निवडणूक लढवावी की नाही याबाबत तुमची स्पष्ट मते सांगा. मला थोडी काळजीच वाटते. वातावरण इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसबाबत सहानुभूतीचे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण निवडून येऊ का? त्यावर इंदापूरचे संपतराव मोहिते म्हणाले, साहेब, आपण पडला तर ते जगातील नववे आश्चर्य असेल.
प्रसंग तिसरा - याच इंदापूर तालुक्यातील दहाबारा कार्यकर्ते काश्मीरला निघाले होते. जम्मूपर्यंत पोहोचले. फारूख अब्दुल्ला यांच्या प्रचारासाठी पवारसाहेबांची जम्मूत सभा होती. सगळेजण या सभेसाठी गेले. सगळ्या शिखांच्या गर्दीत आपली मराठमोळी माणसे साहेबांनी बरोबर ओळखली. त्यांनी बोलावून घेतले. कसे आला, कुठे जाणार याची चौकशी केली. नंतर स्वत:चे हेलिकॉप्टर रद्द करायला सांगितले.
या कार्यकर्त्यांबरोबर ते जीपने काश्मीरपर्यंत गेले. जागोजागची निरनिराळी ठिकाणे दाखवली. श्रीनगरमध्ये जेथे स्वत:ची उतरण्याची व्यवस्था होती,त्या हॉटेलमध्येच त्यांचीही व्यवस्था केली.
असे अनेक प्रसंग इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे ज. मा. मोरे सांगतात. पवारसाहेबांचा विषय निघाला की त्यांचे भान हरपते. पवारसाहेबांनी तुम्हाला काय दिले, या प्रश्नावर मात्र मिश्किलपणे गुढगेदुखी दिली असे उत्तर येते. या उत्तराबरोबरच निमगाव ते पुणे आणि जळगाव ते नागपूर पायी दिंडीची हकीगत सांगायला सुरुवात होते. या दिंडीतही साहेब सर्व कार्यकर्त्यांबरोबर सर्व काळ पायी चालत होते, हे मात्र ते आवर्जून सांगतात.
गुर्हाळावर मते
मोरे इंदापूरच्या निमगाव केतकीचे. राजकारणाचा वारसा वडिलांकडून आलेला. वडील राजकारण, समाजकारणातील इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे नाव. एकदा विधानसभेला गावाचे मतदान कोणाला द्यायचे, यावर गावाची मीटिंग सुरू होती. वडिलांनी मत मांडले. बावड्याचा शंकरराव पाटील म्हणून उमेदवार उभा आहे, त्याला मते द्यावी. मुलगा चांगला आहे, शिवाय घरचे गुर्हाळ आहे, आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने भ्रष्टाचार करणार नाही. या युक्तिवादावर गावाची मते शंकरराव पाटलांना मिळाली. मोरे या मीटिंगमध्ये उपस्थित होते. घरी आल्यावर वडिलांना म्हणाले,गुर्हाळ बघून मत देताय, शेतकर्यांच्या पक्षाचा उमेदवार तुळशीदास जाधव उभे आहेत. त्यांचा विचार करत नाही?फफ
यानंतरही गावाची मते शंकरराव पाटलांनाच मिळाली.
मात्र याच शंकरराव पाटलांशी मोरेंचा सततचा राजकीय संघर्ष होत राहिला. योग्य कार्यकर्ता ओळखायचा, त्याला बळ द्यायचे ही शरद पवारांची राजकीय नीती. मोरेंचा शंकररावांशी होत असणारा राजकीय संघर्ष पवारसाहेब जवळून पाहत होते. मोरेंना त्यांनी बोलावून घेतले. त्यांना सांगितले, आपण बरोबर काम करू. तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा. मोरेंनी गावासाठी पाणी मागितले.
साहेबांनी गावासाठी पाणीयोजना मंजूर केली. निमगावची ही पाणीयोजना ७७ साली १ महिन्यात मोरेंनी पूर्ण करून घेतली. त्याच्या उद्घाटनासाठी पवारसाहेबांना बोलावले. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. यानंतर इंदापूर तालुक्यातील पवारांचा कार्यकर्ता म्हणजे ज. मा. मोरे हे समीकरण पक्के झाले. सतत तीन विधानसभांच्या निवडणुका शंकरराव पाटील यांच्याविरोधात ज. मा. मोरेंनी लढविल्या. प्रत्येकवेळी २५०० ते ३००० मतांनी पराभव झाला; पण हिंमत कधीच हरले नाहीत. लोकांशी संपर्क कधीच तोडला नाही. या सार्यात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते शरद पवार.
सचिवालयात शिपाई करा
पवारसाहेबांचा सततचा सहवास लाभला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साहेबांबरोबर जाण्याचा योग आला. त्यातून मोरेंचा स्वभाव हसतमुख. सतत काहीतरी विनोद करत राहणार. साहेबही दिलखुलास दाद देणार. एकदा साहेब मुख्यमंत्री असताना मोरेंना म्हणाले, जमा, तुम्हाला अशी कोणती जागा देऊ, ज्यामुळे मी बोलावताच लगेच तुम्ही येऊ शकाल. मुख्यमंत्रीपदावर खूप टेन्शन असते. तुमच्याबरोबर गप्पा मारल्या तर टेन्शन कमी होईल.
हजरजबाबी मोरेंनी लगेच उत्तर दिले, साहेब, मला सचिवालयात शिपाई करा, तुम्ही बेल वाजवली की लगेच हजर.यानंतर काही काळाने साहेबही मुख्यमंत्री राहिले नाहीत. त्यानंतर साहेबांची भेट झाल्यावर मोरे पुन्हा म्हणालेच, साहेब, ते सचिवालयात शिपायाचं काम राहिलंच की!
साहेब विरोधी पक्षात असतानाची गोष्ट. पुणे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष टिकतच नव्हता. ज्याला जिल्हाध्यक्ष करावे तो काही महिन्यांत सत्ताधारी काँग्रेस पक्षात प्रवेश करी. दोनतीनदा असे झाल्यावर साहेबांनी ठरवले, आता अशा कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष करायचे, जो काही झाले तरी पक्ष सोडून जाणार नाही. यासाठी पहिले नाव साहेबांना आठवले ते ज. मा. मोरेंचे.
ज. मा. मोरेंनी ११ वर्षे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. सतत कार्यकर्त्यांशी संपर्क, गावोगाव भेटी देत राहिले. फारसा पैसा नव्हता, साधने नव्हती. फक्त एकच बळ होते, ते म्हणजे शरद पवार. मागितला त्या वेळेस साहेबांनी वेळ दिला. याच बळावर जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेतली. साहेबही पदाचा मान राखीत. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यातील आमदारकीचे तिकीट मोरेंनी नक्की केले.
त्या तालुक्यातील लोकांना ते पसंत नव्हते. ते पवारसाहेबांकडे गेले. पवारसाहेब म्हणाले, जिल्हाध्यक्षाला विचारल्याशिवाय मी बदल करणार नाही. त्यांनी मोरेंना फोन लावला. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांचा होकार घेतला, त्यानंतरच तिकीट बदलले. सत्ता असो किंवा नसो. शरद पवार या नावाला एक वलय होते. विश्वास होता. त्याच बळावर विधानसभेला एस काँग्रेसचे ५७ आमदार निवडून आले, त्यापैकी ७ पुणे जिल्ह्यातील होते.
लोकांचे ऐकून घेण्याची साहेबांची क्षमता अफाट. एखाद्या सभेला साहेब आले की व्यासपीठावर बसत. चार तास, पाच तास कार्यकर्त्यांची भाषणे होत. साहेब लक्षपूर्वक ऐकत असत. कार्यकर्त्यांना आग्रह करून बोलायला उभे करीत. सर्वांचे ऐकल्यावर साहेब भाषणाला उभे राहत. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, त्याला भाषण करता आले पाहिजे, यावर कटाक्ष असे. अनेकदा कार्यकर्त्यांना मोरेंचे उदाहरण देत. कार्यकर्ता कसा असावा, कसे काम करावे हे पाहायचे असेल तर इंदापूरच्या ज. मा. मोरेंकडे जा. ते कसे काम करतात ते पाहा, असे सांगत असत.
साहेबांशी बोलताना मोरे कोणताही आडपडदा ठेवायचे नाहीत, मनात येईल ते बोलणार. एकदा साहेबांसोबत हेलिकॉप्टरने जाण्याचा योग आला. विमानतळावर साहेबांसोबत गेले. हेलिकॉप्टर तयार होते. पायलटची पत्नी त्याच्यासाठी डबा घेऊन आली होती. तिने सहज विचारले, आज कोणाला घेऊन जाणार आहे? पायलटने शरद पवारांचे नाव सांगितल्यावर ती म्हणाली, मला त्यांना भेटायचे आहे.साहेब येईपर्यंत ती थांबली. साहेब आल्यावर पुढे येऊन नमस्कार करून म्हणाली, मला ओळखलं का? तुम्ही मला बघायला आला होता?
साहेबांच्याही लक्षात आले, ते म्हणाले, हो, तुम्ही त्या कर्नलसाहेबांची मुलगी ना? साहेबांनी नंतर सगळी हकीगत सांगितली ती अशी ः पवारसाहेब त्या मुलीला बघायला गेले. मध्यस्थ होते श्रीनिवास पाटील. मुलीच्या वडिलांनी विचारले, काय करता? उत्तर आले, मी आमदार आहे. मुलीचे वडील म्हणाले, ते नाही, पोटापाण्याची सोय काय? पवारसाहेबांनी उत्तर दिले, महिन्याला तीस रुपये भत्ता मिळतो.
मुलीचे वडील म्हणाले, अहो, माझ्या मुलीचा दररोजचा खर्च तीस रुपये आहे. तुम्ही माझ्या मुलीला काय सांभाळणार? हे जमणार नाही.एवढ्यावर पवारसाहेब आणि श्रीनिवास पाटीलांना परत यावे लागले. ही हकिगत ऐकल्यावर मोरे त्या बाईंना म्हणाले, वडील आहेत का अजून? तिने हो म्हणाल्यावर म्हणाले, त्यांना सांगा, आज तुमच्या जावयाला पवारसाहेबांची ड्युटी होती ते. तुम्हाला सांगायला जमणार नसेल तर मी येतो घरी.
असाच एकदा विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. मराठवाड्यात कुठेतरी मोठी सभा झाली. हजारो माणसे सभेला रात्री १० नंतरही जमली होती. सभेनंतर जेवण वगैरे करून गेस्टहाऊसवर जायला रात्रीचे बारा वाजले. जमा आणि काही कार्यकर्ते एका खोलीत झोपायला गेले. पवारसाहेब त्यांच्या खोलीत गेले.
रात्री दोननंतर साहेब पुन्हा आले. म्हणाले, तुम्ही झोपला काय? अशी मोठी सभा झाली की मला झोपच लागत नाही. एवढ्या माणसांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. यांच्या अपेक्षा आपण केव्हा पूर्ण करणार या विचाराने माझी झोप उडून जाते.