सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाने संथ गतीने अखेर काल मंगळवारी (दि.५ ऑक्टोबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शंभरी पार केली.
आता उजनी धरणात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी व नदीवर अवलंबून असलेल्या उद्योजक, व्यावसायिक यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे. 42 वर्षांच्या इतिहासातील उजनी धरण 100 टक्के भरण्याची ही 37 वी वेळ आहे.
यावर्षी पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील चार महिन्यात एकदाही दौंड मधून एक -दोन लाखांच्या क्युसेस ने पाणी उजनी त आले नाही,मात्र अगदी काही हजारांच्या क्युसेसच्या नियमित पाण्याच्या विसर्गाच्या जोरावर धरण भरले.
सध्या उजनीत 117 टीएमसी पाणी साठा झालेला आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत धरणात 111.19 टक्के पाणी पातळी व 123.28 टीएमसी पाणी साठा होणे नियोजित आहे. दौंड येथून 3200 क्युसेक्स ते 25-35 हजार क्यूसेक्स पर्यंत विसर्गाने पाणी आलेले आहे व अशा लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज 100% ची पातळी गाठली आहे.
उजनी धरणात पाणी येणाऱ्या भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा,मुठा, पवना, इंद्रायणी आदी लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या 19 धरणांपैकी 16 धरणे शंभर टक्के भरून ‘ओव्हरफ्लो’ झालेली आहेत, तसेच यातील 6 ते 7 धरणांमधून जास्त झालेले एकुण सहा ते सात हजार क्युसेक्स पाणी खाली प्रवाहात सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या बंडगार्डन येथील विसर्ग 5710 क्युसेक्स आहे तर दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ होत आहे व सध्या तो 7663 क्युसेक्स इतका आहे आणि यामध्ये प्रत्येक तासाला वाढ होत आहे .
4 ऑक्टोबर पासून पुणे जिल्ह्यातील धरणे भरली आहेत.जादा होणारे हे पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे धरणात 108 ते 109 टक्के पाणीसाठा होताच, दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा विचार करून, धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. अन्यथा तोपर्यंत नाही असे धरण नियंत्रण विभागाने सांगितले. सध्या धरणात होत असलेल्या पाणीपातळीच्या वाढीकडे नियंत्रण विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
5 ऑक्टोबर 2021 रोजी उजनी धरणाची रात्रीची स्थिती..
पाणी पातळी 496.835 मिटर
एकूण साठा 3321.72 दशलक्ष घनमीटर
117.29 टीएमसी
उपयुक्त साठा 1518.91 दशलक्ष घनमीटर
53.63 टीएमसी
👉🏽 टक्केवारी 100.11 % टक्के
दौंड येथून विसर्ग–7663 क्यूसेस
बंडगार्डन विसर्ग– 5710 क्यूसेस
👉🏽धरणातून विसर्ग
सीना- माढा सिंचन योजना… 259क्यूसेस
दहिगाव – 63 क्यूसेस