नगर : महान्यूज लाईव्ह
बंधार्यात मासे पकडण्यासाठी केलेली तीन मुले एकाचा पाय घसरल्याने तो बुडू लागला आणि त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड करत उर्वरित दोघेही पाण्यात उतरले. मात्र पोहता येत असूनही तिघेही बुडू लागले, तेव्हा त्यातील एका मुलाच्या वडिलांनी पाण्यात उडी घेतली. दोघांना वाचवले, मात्र स्वतःच्या मुलाला वाचता आले नाही आणि स्वतःलाही वाचता आले नाही.
ही दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यातील मुशर्तपूर गावच्या मंडपी बंधाऱ्यात घडली. या घटनेत संजय मारुती मोरे (वय ३५) आणि सचिन संजय मोरे(वय १५) या बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या बंधाऱ्यात सचिन संजय मोरे ओम दत्तात्रय मोरे आणि शुभम योगेश पवार तीन मुले मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पडला, तर दोघे जण त्याला वाचवण्यासाठी उतरले. मात्र पाणी खूप असल्याने त्यांचाही जीव धोक्यात असल्याचे दिसताच संजय मारुती मोरे यांनी वाहत्या पाण्यात उडी मारली.
त्यामध्ये त्यांनी पुतण्या ओम मोरे आणि शुभम पवार या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. सचिनला वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात उडी घेतली. मात्र सचिनचा धरलेला हात निसटला. मुलगा वाहत जात असल्याचे पाहून त्याचा शोध घेताना संजय मोरे यांचाही मृत्यू झाला.
ही घटना समजताच तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले घटनास्थळी हजर झाले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावातील अन्वर शेख, संतोष गोसावी, अनिल दवंगे यांच्यासह स्थानिकांनी प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.