पुणे: महान्यूज लाईव्ह
कोरूना च्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे रोजगार हिरावले गेले मात्र याच काळात नोकरी गेलेल्या एका तरुणाने पुण्यातील साने गुरुजी वसाहत येथे मंदिरात जाऊन दत्तात्रयाचे दर्शन घेतले आणि चाकूने स्वतःवर वार करत स्वतःला संपवून टाकले.
मुळच्या मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूरचे रहिवासी असलेला व सध्या पुण्यात राहत असलेला 22 वर्षीय राजेंद्र रमेश महाजन या युवकाने दत्तवाडी परिसरातील साने गुरुजी वसाहतींमधील दत्त मंदिर बाहेर चाकूने वार करून आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
राजेंद्रचे नातेवाईक मध्य प्रदेश मध्येच राहतात. तो नोकरीसाठी पुण्यामध्ये राहत होता. नोकरी गेल्याने त्याला नैराश्य आले होते. गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान त्याने दत्तवाडी येथील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिरा बाहेर आल्यानंतर सोबत आणलेल्या चाकूने स्वतःवर वार केले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केले असून पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.