बारामती ::महान्यूज लाईव्ह
मी मंत्रालयात असून माझ्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध आहेत असे सांगून बारामतीतील सहा जणांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेवर आज बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर उर्फ हेमंत निंबाळकर असे या लखोबा लोखंडे चे नाव असून तो सातारा व कोल्हापूर येथे वावरत असल्याची माहिती आहे.
दरम्यान या संदर्भात महान्यूज ने वृत्त प्रकाशित केले होते. आज बारामती शहरात याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान या संदर्भात बारामती शहरातील काही महिलांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून या फसवणुकीच्या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली होती.
त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांनी तातडीने दखल घेऊन त्याचा पाठपुरावा केला आणि कोल्हापूर व सातारा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक या सागर उर्फ हेमंत निंबाळकर यांच्या तपासासाठी रवाना झाले.
आज विजयालक्ष्मी अळ्ळीगी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांच्या फिर्यादीनुसार हेमंत निंबाळकर यांनी मी मंत्रालयात कामाला असून तुम्हाला नोकरीला लावतो अशा प्रकारचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला व शहरातील सहा जणांकडून पैसे घेतले आणि पोबारा केला. यामध्ये फिर्यादी विजयालक्ष्मी अळ्ळीगी यांचे दोन लाख रुपये हेमंत निंबाळकर याने घेतले असून सिद्धेश्वर देशमुख यांचे 90 हजार रुपये; निनाद सुतार यांच्याकडून एक लाख रुपये; मयूर काळे यांच्याकडून 73 हजार रुपये त्याने घेतले.