इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे – सोलापूर महामार्गावर भरधाव वेगाने कार चालवताना कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने वाहन डिव्हायडर क्राॅस करत लेन वरुन सर्व्हीस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात तीन गंभीर,तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातात गंभीर जखमी मध्ये 9 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी नजीक असणाऱ्या लोंढेवस्तीजवळ घडला.
पुणे – सोलापूर महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूर दिशेने निघालेल्या एका ह्युंदाई कंपनीच्या आय -10 कार (क्रमांक MH12 5503) वरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडर क्रॉस करून पुणे सोलापूर पुणे लेन क्रॉस करून सोलापुर-पुणे रोडचे सर्व्हीस रोडला जाऊन पलटी झाली.
या अपघातात अर्चना रमेश गांगुर्डे (वय 60 वर्षे) कमल विलास गांगवे (वय 60 वर्षे), कार्तिक लक्ष्मण अंधारे (वय 9, सर्व रा.सोमाटणे फाटा, पुणे) हे गंभीर जखमी झाले.तर वाहन चालक सुधीर रमेश गांगवे (वय 30), रमेश विठू गांगवे (वय 65 दोघेही रा.यावली ता.मोहोळ जि. सोलापूर) हे किरकोळ जखमी झाले.
सदर घटनेची महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून महामार्ग पोलिसांना माहिती मिळताच पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस हवालदार संतोष कुंभार, पोलीस हवालदार नितीन राक्षे, पोलीस हवालदार राजू जगदाळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्तांच्या मदतीला श्रीधर जालिंदर बेसरे (रा.लोंढे वस्ती), सागर कुंडलीक डोंगरे (रा.लोणी देवकर) हे देखील धावून आले. सर्व जखमींना उपारार्थ सरडेवाडी टोलच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे पाठवण्यात आले आहे.