दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : युवाशक्ती ही देशाची ताकद असून या शक्तीला शिस्तीचे धडे मिळाले, तर ती देशसेवा करेल असे काम किसन वीर महाविद्यालयाचे विद्यार्थी करीत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे असे मत वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी व्यक्त केले.
येथील एन.सी.सी.च्या छात्रांनी वाई बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, वाई पोलीस ठाण्याच्या आवारात हातात झाडू, घमेली, खोरी घेवून स्वच्छता केली. यावेळी भरणे म्हणाले,
महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सर्व प्रकारचे सेवाकार्य केले जाते. या दिवशी स्वच्छता मोहिमेपासून राज्य सरकार आणि अनेक गांधी अनुयायी स्तुत्य उपक्रम राबवून आपापल्या कार्याने गांधीजींना आदरांजली वाहताना दिसतात.
किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी च्या कार्यक्रमाचे संयोजक लेफ्टनंट समीर पवार यांनी एन.सी.सी. छात्रांची शिस्तबद्ध फळी उभी केली व त्यांना समाजातील अनेक सुख दुखांच्या कार्यक्रमात मदतकार्य करण्यासाठी पाठविले जाते. यातून विद्यार्थ्यांमध्ये देशभावनेची आवड नक्कीच निर्माण होण्यास मदत होईल असेही भरणे म्हणाले.
या कार्यक्रमात वाई पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, वाई ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रीमती बचुटे, डॉ. विठ्ठल भोईटे, वाई आगारप्रमुख गणेश कोळी, आगार नियंत्रक किरण धुमाळ यासह किसन वीर महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.