मुंबई महान्यूज लाईव्ह
अलिकडच्या काळातील नवी पिढी सेलिब्रिटींवर अक्षरशः जीव उधळून टाकते. प्रचंड प्रेम करतात, कसल्याश्या सुपरस्टारवर…! पण त्यांच्या राती, अर्ध्या रातीचा पार्ट्यांचा खेळ जोवर पाहत नाहीत, तोवरच….! आताही एक नवी बातमी आहे.. गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केलेली आहे. प्रसिध्द अभिनेता शाहरूख खानच्या पोराचीही या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांकडील माहिती आहे.
मुंबईकडून गोव्याकडे निघालेल्या कार्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या क्रूझवर ही पार्टी आय़ोजित करण्यात आली होती. त्यासाठी फक्त उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत व तथाकथित उच्चभ्रूंनाच प्रवेश होता. याची माहिती मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या पथकाने प्रवासी बनून या क्रूझमध्ये प्रवेश मिळवला आणि जहाजाने मुंबई सोडल्यावर काही अंतरावर जाताच या कारवाईला सुरवात केली.
या कारवाईत शाहरूख खानच्या पोराची चौकशी एनसीबीने सुरू केली आहे. त्याचा मोबाईल जप्त केला असून या प्रकरणात आतापर्यंत ज्या आठ जणांना पकडण्यात आले आहे, त्यामध्ये दिल्लीतील तीन मुलींचा समावेश आहे. अर्थात शाहरूख खानच्या पोराची फक्त चौकशीच का सुरू झाली यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतरांना मात्र अटक आणि याची मात्र चौकशी? यावर मुंबईत सध्या विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.