बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पॅनेल जाहीर होणार आहे. या पॅनमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे आज स्पष्ट होणार असले तरी, शनिवारी बारामतीत झालेल्या मेळाव्यात अजितदादांनी जे संकेत दिले आहेत, त्यानुसार कोणत्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना या पॅनेलमधून वगळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक व अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी कसब्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडल्या. यामध्ये इच्छुकांची संख्या एवढी होती की दोन गटातील मुलाखती अजित पवार यांना वेळेअभावी घेता आल्या नाहीत.
यावेळी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी वेगळ्या प्रकारे संकेत दिले. यामध्ये त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अर्ज भरलेल्या, परंतु पॅनेलमध्ये न घेतलेल्या कोणत्याही उमेदवारांची मनधरणी आपण करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच अजित पवार यांचे संकेत लक्षात घेता, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर देखील थांबण्याची वेळ येऊ शकते अशी चिन्हे आहेत.
यावेळी अजितदादांनी महत्त्वाच्या काही लोकांना यावेळी थांबावे लागेल, असे स्पष्ट केल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर मेळाव्याच्या वेळीच चिंतेचे काहूर दिसत होते. बोलता-बोलता अजित दादांनी त्यांच्या भाषणात संचालक मंडळातील या पाच वर्षातील सुंदोपसुंदीचा देखील अप्रत्यक्ष उल्लेख केला. त्यामुळे नाराजीचा फटका कोणाला बसतो याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
दुसरीकडे अजितदादांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कारभार आणि दिलेला भाव पाहता अगदी प्रचार करण्याची गरज भासू नये अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली. समोरच्या पॅनल मधील काही जण संपर्कात असल्याचे देखील त्यांनी यावेळी संकेत दिले.
एकीकडे इंदापूरच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने 2100 रुपये प्रतिटनी भाव दिला असताना, तेथील निवडणूक बिनविरोध होते. मात्र 3100 रुपये प्रति टन भाव दिला असतानाही इथे निवडणुकीचा घाट घातला जातो याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आता अजितदादा नेमका कोणता पॅनल कसा जाहीर करतात आणि कोणते उमेदवार देतात याकडे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत आपण फक्त चार जुन्या आणि अनुभवी लोकांना उमेदवारी दिली होती, याची आठवण अजित पवार यांनी करून दिल्याने कोणत्या 17 जणांवर यावेळच्या निवडणुकीमध्ये आजी संचालकांच्या ऐवजी माजी संचालकाची पाटी लागते याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.