माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. ३ – कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधाच्या काळातही गर्दुल्ल्यांचा उच्छाद कमी झालेला नाही. छुप्या मार्गाने सुरू केलेल्या हुक्का पार्लरवर हुक्क्याचा दम मारत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. अखेर ‘दम मारो दम..मिट जाये गम’ वर राजगड पोलिसांनी दम’दार धाड टाकली. दोघांना अटक केली.
निलेश सुरेश गोळे वय ४१ रा. ( ता. भोर ), श्रीकृष्ण भगवंत तांदळे (वय २५ मूळ रा. हिंगणी, बीड सध्या रा. नऱ्हे ता. भोर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजगड पोलिसांनी शनिवारी २ ऑक्टोबर रोजी नऱ्हे ( ता. भोर ) हद्दीत दमो स्पेअर हॉटेलमध्ये दुपारी साडतीनच्या सुमारास ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी या हुक्का पार्लरमधून हुक्का, पाट टेबल, आफ्रिन पान, सालसा हुक्का फ्लेवर मसाला, तंबाखू, आफ्रीन किवी, हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप, विविध फ्लेवरचे डबे असा सुमारे साडेसहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऱ्हे ( ता. भोर ) येथे आरोपी निलेश गोळे आणि श्रीकृष्ण भगवंत तांदळे यांनी विनापरवाना हुक्का पार्लरची जाहिरात केली. त्यावरून दमो स्पेअर हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने कारवाई केली आणि या दोघांना ताब्यात घेतले.
मात्र, यावेळी पोलिसांना पाहताच पाच टेबल पैकी तीन टेबलवरील हुक्का ओढणाऱ्या तरुणांनी पलायन केले. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक दिनेश गुंडगे, पोलीस नाईक नाना मदने, गणेश लडकत, कॉन्स्टेबल योगेश राजीवडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.