मोफत सातबारा वाटप उपक्रमाचे नागरिकांनी लाभ घ्यावा : विठ्ठल आवाळे
माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २ – ‘सातबारा हा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यासाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. यासाठी महसूल विभागाने सुरू केलेला मोफत सातबारा वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत उपक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना अद्ययावत केलेले सातबारे डिजिटल स्वाक्षरीने दिले जात असून या उपक्रमाचे जास्तीजास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त महसूल व वन विभागाच्या वतीने ‘शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उतारा वाटपाचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या हस्ते नसरापूर ( ता. भोर ) येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नोडल अधिकारी जे. आर. सोनवणे, महसूल विभागाचे मंडलाधिकारी श्रीनिवास कंद्देपल्ली, विस्तारधिकारी संजय रुईकर, तलाठी नेहा बंड, प्रज्ञा खरात, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, सदस्य इरफान मुलाणी, सदस्या सपना झोरे, अश्विनी कांबळे, बाजार समितीचे उपसभापती संपतराव आंबवले, अरविंद सोंडकर, खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानेश्वर झोरे, बळीराजा संघटनेचे कृष्णा फडतरे, अनिल गायावळ, विजय जंगम, शेतकरी दत्तात्रय वाल्हेकर, तात्या निगडे, सागर राशीनकर, राजेश कदम, अमोल पांगारे, संकेत हाडके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मंडलाधिकारी श्रीनिवास कंद्देपल्ली यांनी माहिती देताना सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार, २ ते ९ ऑक्टोबर पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून एका तलाठ्यांकडे एक पेक्षा जास्त महसुली गावे असल्याने २ ऑक्टोबर रोजी महसुली सजा मुख्यालयाच्या ठिकाणी व त्यानंतर इतर गावांमध्ये ९ ऑक्टोबर पर्यंत मोफत सातबारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपस्थितांचे स्वागत तलाठी नेहा बंड यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले. आभारप्रदर्शन करताना कृष्णा फडतरे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.