बारामती : महान्यूज लाईव्ह
परिवहनमंत्री अनिल परब यांचे तात्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बारामती तालुक्यातील रुई येथील कथित मालमत्ता पाहण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या येत्या ६ ऑक्टोबर रोजी बारामतीत येणार आहेत.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी या संदर्भात आज माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दौरा मागील वेळीप्रमाणेच असणार आहे. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांचा बारामतीचा नियोजित दौरा होता. मात्र तो दौरा ऐनवेळी रद्द झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा प्रदान केल्याने त्यांच्या दौऱ्याची आयत्या वेळी आखणी झाली नाही. तसेच खरमाटे यांच्या कथित मालमत्तेची कागदपत्रेही काढण्यात विलंब झाला होता. आता त्यांना या मालमत्तेची संपूर्ण कागदपत्रे देण्यात आली असून त्यांचा येत्या ६ ऑक्टोबर रोजी नियोजित दौरा असणार आहे.
६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करून बारामतीत पोचणार आहेत. त्यानंतर ते रुई येथील संबंधित मालमत्तेची पाहणी करणार आहेत. तेथून ते भाजपच्या बारामतीतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.