करमाळा – महान्यूज लाईव्ह
उंदरगाव येथील आश्रमात झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा मनोहर भोसले याला करमाळा न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनोहर भोसले याला बारामतीतील अंधश्रध्दाविरोधी कायद्यांतर्गत झालेल्या तपासानंतर करमाळा येथील बलात्कार प्रकरणात १९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून भोसले हा करमाळा पोलिसांच्या ताब्यात आहे.
त्याला खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र तपास पूर्ण झाला नसल्याने त्याला पुन्हा पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती.
विशेष म्हणजे मनोहर भोसलेचा मास्टरमाईंड विशाल वाघमारे हा अजूनही फरार आहे. विशाल वाघमारे हा पोलिसांना सापडत नसल्याने ते पोलिसांचे अपयश मानायचे का? असा सवाल उपस्थित होत असून मनोहर भोसले हा पोलिसांना सापडत असेल, तर विशाल वाघमारे हा सापडत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशाल वाघमारे हा मनोहर भोसलेच्या आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता अशी चर्चा असून विशाल वाघमारे याच्या शोधावर मनोहर भोसलेकडे येणारा पैसा कोठून येत होता व किती येत होता हे उघडकीस येणार आहे. त्यामुळे विशाल वाघमारे याच्या शोधावर बऱ्याच जणांची नजर आहे.