दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथे शुक्रवारी (दि.1) यवत येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीचे भारत गॅस घरगुती सिंलेडर (टाकी ) यामध्ये दोन ते अडीच किलो ग्रम वजन कमी असल्याचे निदर्शानास आल्याने गॅस वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पाटस पोलीसांनी दिली.
सुभाष पुनाराम विष्णोई (वय 23, रा. यवत ता. दौंड जि.पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, यवत येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीचे भारत गॅस या कंपनीचे अधिकृत विक्रेते असलेली पिकअप टेम्पो हा शुक्रवारी ( दि.1) सायंकाळी वरवंड येथे आला. ग्राहकांना भारत कंपनीचा घरगुती गॅस टाकी वाटप करताना काही ग्राहकांना शंका आली. टाकी घरी घेवून जाण्यासाठी उचलली असता ती वजनाने कमी असल्याची शंका आल्याने ग्राहकांनी त्वरीत दौंड तहसीसदार कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधला. व हा प्रकार सांगितला.
ही माहिती मिळताच तालुका पुरवठा निरीक्षक विनोद धांडोरे वरवंड येथे घटनास्थळी आले. ग्राहकांची तक्रार ऎकुन घेतल्यानंतर या गॅस वाहतुक पुरवठा करणा-या वाहनांमध्ये एकूण 40 भारत गॅस कंपनीचे घरगुती सिलेंडर टाक्या सीलबंद भरलेल्या असल्याचे निदर्शनास आले. यापैकी सहा गॅस टाकीमधील वजन केले असता ते क्षमतेपेक्षा कमी असल्याचे निदर्शानास आले. एका टाकी मध्ये 29.09 किलोग्रम वजन भरणे अपेक्षित आहे. असे असताना ही या सहा टाक्यांमध्ये दोन ते अडीज किलोग्रम वजन कमी असल्याचे आढळून आले.
त्यामुळे महालक्ष्मी गॅस एजन्सी भारत कंपनीच्या भरलेल्या घरगुती गॅसच्या टाक्यामधील गॅस कशानेतरी काढल्याचा संशय बळावल्याने तपासणी केली असता हे निदर्शानास आले. घरगुती गॅस ही जीवनावश्यक वस्तू असताना आणि क्षमतेपेक्षा कमी वजनाचे टाकी ग्राहकांना वाटप करून लोकांची फसवणूक केली जात होती. ही फसवणूक केल्याप्रकरणी पुरवठा विभागाने महालक्ष्मी कंपनीची गॅस वाहतूक करणारी पिकअप टेम्पो वाहन (क्रमांक एम.एच.42 एम.6560) यासह एकुण 4 लाख 63 हजार 328 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दौंड तालुका पुरवठा निरीक्षक विनोद धांडोरे यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानंतर वाहनचालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच दौंड शहरात घरगुती गॅसचा सिलेंडर चा काळबाजार उघड झाला होता. याप्रकरणी सात जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली होती. आता ही घटना ताजी असताना तालुक्यातील ग्रामिण भागात पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वाहनचालक तसेच कर्मचारी यांच्यावरच गुन्हा दाखल न करता अधिकृत गॅस एजन्सी मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.