मला भेटलेली माणसे – घनशाम केळकर, बारामती.
सध्या एकाच गोष्टीच्या शोधात आहेत. पेट्रोलच्या…! विश्वास बसत नाही ना?… पण हे सत्य आहे..! हातात बाटल्या घेऊन पेट्रोलच्या शोधात निघालेले लोक लंडनच्या रस्त्यावर दिसताहेत. यांचा उद्रेक झाला तर त्यांना रोखण्यासाठी चक्क सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
पेट्रोलची अशी अभूतपूर्व टंचाई का आहे? खरं तर याचा शोध घेतला तर आपल्याला खरं वाटणार नाही, कदाचित हसायला येईल. पण हे खऱे आहे की, अजून जगात पेट्रोल दुर्मिळ झालेले नाही. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे पेट्रोल उपलब्ध होऊ शकते. अगदी ब्रिटनमध्ये देखील..! मुळात प्रश्र्न पेट्रोलच्या टंचाईचा नाहीच आहे.
ब्रिटनमध्येही पेट्रोलची कमी नाही आहे. प्रश्न पेट्रोल पंपावर पोचविण्याच्या यंत्रणेचा आहे. ही यंत्रणा ब्रिटनमध्ये कोसळली आहे, त्यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे.
आता पुढचा प्रश्न! ही यंत्रणा का कोसळली आणि ब्रिटनमध्येच का कोसळली? – पेट्रोल हे ज्वलनशील आहे, त्यामुळे त्याची वाहतूक करण्यासाठी ब्रिटनमध्ये स्पेशल टॅंकर आहेत. ते टॅंकर चालवण्यासाठी स्पेशल ड्रायव्हर आहेत. असा ड्रायव्हर होण्यासाठी विशिष्ट असे लायसन्स घ्यावे लागते. असे लायसन्स असणाऱ्या ड्रायव्हरची खुप कमी आहे, त्यामुळे वाहतूक खूप कमी होते आणि पंपावर पुरेसे पेट्रोल पोचत नाही.
सध्या ब्रिटनला कमीत कमी १ लाख असे ड्रायव्हर हवे आहेत. आता पुढचा आणि महत्वाचा प्रश्न! ड्रायव्हरची अशी टंचाई ब्रिटनमध्ये का आहे? याचे पहिले कारण म्हणजे ब्रिटनने इतर युरोपीय देशांशी घेतलेला काडीमोड.
यामुळे इतर देशांतील असे जे ड्रायव्हर्स देशात होते, ते त्यांच्या त्यांच्या देशात निघून गेले.
आणि दुसरे कारण आहे कोरोना..! कोरोनामुळे सगळ जग थांबल. ब्रिटनमध्येही लॉकडाऊन लागला. पेट्रोलचे टॅंकर थांबले. बेरोजगार ड्रायव्हर्स आपापल्या गावी निघून गेले. ते अजूनही कामावर हजर झालेले नाहीत.
तिसरे कारण नेहमीच. पेट्रोल कमी पडतय असे लक्षात येताच लोकांनी साठा करायला सुरुवात केली. पेट्रोलपंपावर रांगा लागल्या. लोकांनी घराघरात पेट्रोल साठवले. टंचाई आणखी वाढली. लोकांनी आणखी जोमाने साठा करायला सुरुवात केली.
असा हा सगळा जांगडगुत्ता आहे बघा..! अर्थातच ही टंचाई तात्पूरती आहे. काही दिवसात ही स्थिती निवळेल. सध्या तिथल्या सरकारने लष्कराचे ड्रायव्हर्स कामाला लावले आहेत. नविन लायसन्स देण्याचे काम देखील सुरु आहे. जगभरातील कुशल ड्रायव्हर्स साठी पायघड्या पसरलेल्या आहेत. त्यामुळे कोठून तरी ड्रायव्हर नक्कीच मिळतील. मात्र आता हा प्रश्नांचा गुंता आपल्याजवळ येऊन ठेपतोय… बघा तुम्हाला संधी मिळते का? नाही म्हणजे मंदीत एरवी संधी शोधणारे आपले मेंदू.. तोपर्यंत स्वत:ला अतीशहाणे समजणाऱ्या या ब्रिटनच्या लोकांना येड्यात काढायला काय हरकत आहे?