पुणे : महान्यूज लाईव्ह
बारामती सध्या सुरू असलेल्या बसस्थानकाच्या बांधकामासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हे बसस्थानक राज्यातील सर्वात आधुनिक आलिशान आणि अगदी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्जाचे असणार आहे.
बारामतीचे बस स्थानक हे राज्यातील सर्वात अलिशान असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले होते. त्यांच्या संकल्पनेतून हे बसस्थानक आता आकाराला येऊ लागले आहे. राज्यातील सर्वात अलिशान अशा अर्थाने हे बसस्थानक असेल, जिथे महिला प्रवाशांसाठी पुरुष प्रवाशांसाठी अत्यंत चांगल्या सुविधा असतील. त्याचबरोबर प्रशस्त विश्रांती कक्ष असतील. कार्यालये दर्जेदार असतील आणि साहित्य घेऊन जाण्यासाठीची सुविधा देखील एकदम वेगळी असेल.
नव्या बसस्थानकामध्ये बावीस बसथांबे असतील आणि 87 बसेस उभ्या करता येतील असे प्रशस्त पार्किंग असेल. हे बसस्थानक येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे अशी माहिती पुणे विभागाचे प्रमुख रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.