सुरेश मिसाळ : महाराज लाईव्ह
इंदापुरात शेतजमिनीच्या वादातून इंदापूरचा माजी नगरसेवक शेखर अशोक पाटील याने एका जणावर गोळीबार केला. ही गोळी शेतकऱ्याच्या कानाजवळून गेल्याने शेतकरी थोडक्यात बचावला. मात्र या घटनेने इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी शेखर अशोक पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शेखर पाटील हा दिवंगत मंगेश पाटील यांचा पुतण्या असून चुलते मेघश्याम, चुलतभाऊ गणेश आणि सातपुते या शेतकऱ्याच्या विरोधात त्याने आज हा गोळीबार केला. त्याने पिस्तूलमधून एक गोळी सातपुते यांच्या दिशेने झाडली.
यासंदर्भात इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भानुदास पंढरीनाथ सातपुते (वय २१ वर्षे रा. सातपुतेवस्ती माळवाडी) यांनी यासंदर्भात इंदापूर पोलिसांना फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इंदापुरातील सातपुते वस्ती जुना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला घडली.
सातपुते व मेघशाम वामनराव पाटील, त्यांचा मुलगा गणेश मेघश्याम पाटील हे तिघे जण आपापसात चर्चा करत असताना व जमिनीची मोजणी व वाटणी करत असताना शेखर पाटील त्या ठिकाणी आला. तुम्ही जमिनीची मोजणी कशी करू शकता? ही जमीन माझी आहे असे म्हणाला व त्यानंतर चुलत भाऊ गणेश पाटील याने ही जमीन माझ्या वडिलांच्या व भानुदास सातपुते यांच्या नावावर आहे तुझा इथे काहीएक संबंध नाही असे सांगितले.
त्यावरून शेखर याने रागात सातपुते व गणेश पाटील यांना शिवीगाळ व दमदाटी केली व धक्काबुक्की केली. फिर्यादी सातपुते व गणेश पाटील याने शेखर यास प्रतिकार केला असता, शेखर याने त्याच्याकडील पिस्तुल काढून ते पिस्तूल सातपुते यांच्या दिशेने रोखले. तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत सातपुते यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने एक गोळी झाडून फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पिस्तुलातून झाडलेली ती गोळी फिर्यादीच्या कानाजवळून गेली व फिर्यादी सातपुते थोडक्यात बचावले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे सहायक निरीक्षक श्री माने करत आहेत.