पुणे : महान्यूज लाईव्ह
सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाईल अँपद्वारे माहिती भरण्यास १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक एन.के. सुधांशु यांनी दिली आहे.
ई-पीक पाहणीची माहिती भ्रमणध्वनीवरील अँपद्वारे गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम संपूर्ण राज्यात १५ ऑगस्ट पासून सुरु केला आहे. या अँपद्वारे आतापर्यंत सुमारे ७० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे नोंदणी केली आहे.
खरीप हंगामासाठी सदर अँपद्वारे माहिती भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु दरम्यानच्या काळात राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक खातेदारांची नोंदणी करणे अद्यापही प्रलंबित आहे.
ई-पीक पाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अँपद्वारे माहिती भरण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या सुविधेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सुधांशू यांनी केले आहे.