दीड टन धातू वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारण्यात आला आहे. महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) यांनी हा पुतळा तयार केला आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता…
शरद पवार यांचा हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फुटांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या पुतळ्याची पाहणी केली. हा पुतळा हुबेहुब साकारण्यात आला असून पवार यांचे शिल्प चित्तवेधक असल्याचे त्या म्हणाल्या.
शरद पवार यांच्या पुतळ्यासाठी दीड टन धातूचा वापर करण्यात आला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना हा पुतळा साकार करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. हा पुतळा साकारण्यासाठी शिंदे या दररोज १० तास काम करत होत्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी २७ सप्टेंबर या दिवशी शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी येथील शिल्पांचे फोटो ट्विट करत माहिती दिली.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे.’
शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी आतापर्यंत अनेक शिल्प साकारली आहेत. त्यांच्या वर्कशॉपमध्ये असलेले राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बालशिवाजी यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात. शरद पवार यांचा पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार शिंदे यांनी पवार यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओंचा अभ्यास केला असे त्यांनी सांगितले.