सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरातील शिवाजीनगर परिसरातील एक घर चोरट्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्य केले आहे. या वर्षात 3 फेब्रुवारी, 31 ऑगस्ट आणि आता 29 सप्टेंबर अशा तीन वेळा याच घरात चोरट्यांनी चोऱ्या केले आहेत.
इंदापुरातील डॉक्टर अरविंद अरकीले यांच्या बाबतीतील ही घटना आहे. बुधवारी रात्री डॉक्टर अरकीले यांची होंडा कंपनीची दुचाकी घराबाहेरून चोरट्यांनी चोरून नेली त्यावरून डॉक्टर अरकीले यांनी इंदापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र फक्त या एकाच चोरीचा विषय नाही, तर अरकीले यांच्या घरी यापूर्वी देखील दोन वेळा चोरट्यांनी चोऱ्या केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी आरकीले यांच्या दवाखान्यामधून तब्बल 12 हजार रुपयांची रोकड आणि इतर किंमती साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते. 31 ऑगस्ट 2021 रोजी देखील डॉक्टर अरकीले यांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी नुकसान केले होते. गाडीतील किमती साहित्य चोरण्याचा चोरट्यांचा यामध्ये प्रयत्न होता.