बहुतांश सभासदांच्या सहमतीने 1 ते 11 विषय मंजुर..
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मागील दोन वर्षापासून बंद आहे हे मान्य आहे. कारखाना सुरू व्हावा अशी सर्वच सभासदांची अपेक्षा आहे. तशीच अपेक्षा संचालक मंडळाचीही आहे. मात्र जिल्हा बॅकेकडे आम्ही दिड महिन्यापुर्वी प्रस्ताव पाठवला आहे. जिल्हा बॅकेने सहकार्य केल्यास कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरू करू असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष, व आमदार राहुल कुल यांनी ऊस उत्पादक सभासदांना दिले.
आर्थिक संकटात सापडलेला आणि मागील दोन वर्षाचा गळीत हंगामात बंद असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 39 वी आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी ( दि.30) कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर पार पडली.
यावेळी सभेच्या प्रास्ताविक भाषणात कुल म्हणाले की, भिमा सहकारी साखर कारखाना हा सभादांचा मालकीची संस्था आहे. ही संस्था काही तांत्रिक अडचणीमुळे अडचणीत सापडली आहे. मागील दोन वर्षापासून गळीत हंगाम बंद आहे हे संचालक मंडळास मान्य आहे. कारखान्यावर बॅकाचे कर्ज आहे हे ही मान्य आहे.
कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. मात्र विरोधक वर्तमानपत्रांकडे जावून चौकशी लावण्याची मागणी करीत आहेत. त्यांनी वर्तमानपत्रांकडे जाण्याऎवजी संचालक मंडळाकडे येवून चर्चा करावी, हा कारखाना कसा सुरू करता येईल यासाठी सहकार्य करावे, सहकार्य करायचे नसेल, तर करू नये, मात्र चुकीच्या पध्दतीने जावून सहकारी संस्था अडचणीत आणण्याचे काम करू नये. ही संस्था वाचली पाहिजे अशीच अपेक्षा संचालक मंडाळाची असल्याचे कुल यांनी बोलताना स्पष्ट केले.
कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या प्रास्ताविक भाषणांनतर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक ए. एन. निबे यांनी अध्यक्षांच्या परवानगी विषय पत्रिकेवरील 1 ते 11 या विषयांचे वाचन करून सभेस सुरवात केली. यावेळी या आनलाईन सभेस उपस्थित सभासदांनी हात वर करून या विषयांवर चर्चा करून विषय पत्रिकेवरील विषय मंजुर करावे की नाही करावे यासाठी चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी 1 ते 11 विषयावर वाचन आणि चर्चा करताना बहुतांश सभासद हात वर करताना दिसताहेत, यामुळे हे विषय मंजुर करण्यात आले आहेत.
अध्यक्षांच्या परवानगीने ऎनवेळीच्या विषयावर चर्चा सुरू झाली. यावर चर्चा करताना कारखान्याचे माजी संचालक वासुदेव काळे म्हणाले की, भिमा पाटस कारखानाचा हंगाम दोन वर्ष बंद आहे. यामुले कारखाना हा लवकर सुरू करावा, तोही सहकार पध्दतीनेच सुरू करावा, येणे बाकी आहे, त्यांच्याकडून वसुलीसाठी संचालक मंडाळाने कठोर भुमिका घ्यावी, कारखाना सुरू करण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा मदत करतील असे मत व्यक्त केले.
तर माजी संचालक योगेंद्र शितोळे म्हणाले, संचालक मंडाळाने पाठवलेल्या अहवालात कारखान्यावर थकीत कर्ज आणि येणे बाकी दिसत आहे. 109 कोटी 63 लाख 86 हजार 140 एवढी रक्कम येणे दिसत आहे.या रक्कमेवर व्याज आकारणी केली जाते का किंवा या रक्कमेची आपण व्याजासह वसुली करणार आहे का ? याशिवाय 17 नंबरची रक्कम दि.31/3/2020 रोजी येणे दिसत नाही मग दि.31/3/2021 ला येणे कशी दिसत आहे. असे असेल तर मागील हंगामात कारखाना बंद असताना हा व्यवहार कशापोटी झालेला आहे. याची लेखी माहिती द्यावी.कारखाना राजकरण
विरहीत चालु करण्यासाठी आमचा पाठिंबा राहील असे मत व्यक्त केले.
तसेच कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे म्हणाले की, कारखाना कधी सुरू करणार आहे,आर्थिक नियोजन कसे असणार हे अध्यक्षांनी सांगावे. मागील चुका विसरून लवकरात लवकर कारखाना सुरू करावा
सभासदांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ही संपत आली आहे. यामुळे निवडणुका लागतील मग कारखाना कसा सुरू करणार असा शितोळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
यावर उत्तर देताना अध्यक्ष कुल म्हणाले की, मागील दोन वर्षाचा हंगाम बंद आहे हे मान्य आहे. आम्ही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी तुमचे सहकार्य पाहिजे. जिल्हा बॅकेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. जिल्हा बॅकेने सहकार्य केल्यास यंदाचा गळीत हंगाम लगेच सुरू करू. तुम्हाला काय माहिती पाहिजे असल्यास मी घरी येवून चर्चा करीन. मात्र धोरणात्मक निर्णय घेवून कारखाना चालु करण्यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.
वैशाली नागवडे म्हणाल्या की, सर्व सभासदांची एकच अपेक्षा आहे की कारखाना सुरू व्हावा. कारखाना सुरू करणे आणि कारखान्याची चौकशी करणे हे दोन्ही विषय वेगळे आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकार जसे संचालक मंडाळाला सहकार्य करीत आहे.तसेच सहकार्य राज्यसरकार ही करेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेवून चर्चा करावी असे मत नागवडे यांनी यावेळी मांडले.
यावर कुल म्हणाले की, सभासदांच्या मालकीची ही संस्था चालु करण्यासाठी आणि वाचविण्यासाठी सर्व सभासद शांतताने सहकार्य करीत आहेत. ही संस्था वाचविण्यासाठी कोणाला ही भेटायची तयारी आहे. कारखान्याच्या कोणत्याही चौकशीला मी तयार आहे.
दरम्यान या आनलाईऩ सभेत धनाजी शेळके, गोरख दिवेकर, हरिभाऊ ठोंबरे, वसंत साळुंखे, किरण देशमुख, संजय इनामके, नितिन म्हैत्रे, उमेश दिवेकर, अभिमन्यु गिरीमकर, अनिल शितोळे, गणेश शेळके, गोरख गाढवे,भानुदास शिंदे, निळकंठ शितोळे आदी सभासदांनी आपले मत व्यक्त केले.