मोरगाव : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मोरगावजवळ आज सकाळी एका अज्ञात वाहनातून कोणीतरी येऊन चक्क दारुचे बॉक्स टाकले. हे दारूचे बॉक्स कोणी आणि का टाकले याबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहेत. पोलीस प्रशासनाने तपास करावा अशी त्यांची मागणी आहे.
आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान निरा -मोरगाव रस्त्यावर शेराचीवस्ती येथे ही घटना घडली. रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने गाडीतून पॅकबंद दारूच्या बाटल्या असलेले बॉक्स रस्त्याच्या कडेला टाकून दिले आहेत.
या घटनेची स्थानिक शेतकरी प्रकाश तावरे व गंगाधर तावरे यांनी माहिती दिली. यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. सांगली जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्यात उत्पादित झालेली ही दारू आहे.
या रस्त्याच्या कडेला दारूचे बॉक्स पडले याची खबर लागताच अनेक मद्यपींनी गपचूप बाटल्यादेखील पळवल्या. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी भेट देऊन काही बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत.
या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करून योग्य कारवाई करतील अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.