खंडाळा : महान्यूज लाईव्ह
माणदेश…. बारमाही दुष्काळाची धग सोसूनही दुष्काळाच्या अन संकटाच्या छाताडावर घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या माणसांचा देश… वर्षानुवर्षे अन पिढ्यानपिढ्या टंचाई पाचवीला पुजलेली असली तरी आहे, त्यात समाधान मानणारी देवमाणसं याच मातीतील.. हा त्या मातीचाच गुण..!
याच मातीतील एका मेंढपाळाचा मुलगा असलेल्या विद्यार्थी संशोधकाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या गटाने थेट आंतरराष्ट्रीय लघुग्रह संशोधन मोहिमेत भाग घेतला आणि एका लघुग्रहाचा शोधही लावला. या शोधावर आता फक्त नासाचे शिक्कामोर्तब बाकी आहे..अर्थात सध्या या विनायकाचा देशात डंकाच वाजतो आहे..
विनायक दोलताडे हे त्यांचे नाव… नासा आणि हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी यांच्या वतीने सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय लघुग्रह संशोधन मोहिम राबवण्यात आली. यामध्ये दोलताडे यांच्या नेतृत्वाखाली गौरव डाहुले, आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनिष जाधव या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. या सहभागादरम्यान त्यांनी एका लघुग्रहाचा शोध लावला.
या लघुग्रहाची नोंद नासाकडे करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षात त्याच्या हालचालींची नोंद करून नंतर त्याचा समावेश खगोल घटकाच्या यादीत केला जाणार आहे. अर्थात या संशोधनाने माण तालुका एकदम आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकला आहे. विनायक दोलताडे हा मेंढपाळाचा मुलगा असल्याने याला आणखीच महत्व आले आहे.