सुरेश मिसाळ : महान्यूज लाइव्ह
कोरोनाच्या काळात जे क्षेत्र भारतामध्ये टिकलं, ते म्हणजे शेती आणि सर्वात नुकसानही झालं ते शेतीचेच..! पण याही संकटाच्या काळात बळीराजा नेहमीप्रमाणेच निधड्या छातीने पाय घट्ट रोवून उभा राहिला. काळ्या मातीशी असलेलं नातं अधिक जोडलं. त्यानं हे नातं घट्ट करण्यासाठी त्याला कष्टाची जोड दिली. त्या कष्टाला काही ठिकाणी सोन्याचे दिवस आले, तर काही ठिकाणी प्राकृतिक बाजारभावाने त्याची माती केली…!
आपण हेही पाहिलं की इंदापूरच्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्याने पोटतिडकीने डोळ्यात पाणी आणत हिरव्या मिरचीचा चिखल केला.. आणि त्याच इंदापुरात दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याला त्याच्या डाळिंबासाठी आत्तापर्यंतचा सर्वोच्च प्रतिकिलो 411 रुपये तर सर्वात कमी आकाराच्या डाळिंबाला एकशे सत्तावीस रुपये किलोपर्यंत दर मिळाला..!
शेती अशीच आहे. ती सुद्धा आता हवेवर चालते. म्हणजे कधीकधी शेतीची सुद्धा हवाच होते.. पिके भरभराटीला तर दरवर्षी येतात; पण कधी मागणीअभावी या पिकांची माती होते, तर कधी पुरवठ्याअभावी या पिकांचे सोनं होतं.. आता हे सोनं म्हणजे काय? तर दोन दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील रामदास फडतरे विठ्ठल फडतरे या बंधूंनी डाळिंबात मिळवलेलं यश म्हणजे सोनं..! फडतरे यांच्या डाळिंबाला सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील बाजार समितीत सर्वोच्च म्हणजे तब्बल 411 रुपये दर मिळाला. त्यांच्या सर्वात छोट्या 100 ग्रॅम आकाराच्या डाळिंबाला 127 रुपये प्रति किलो दर मिळाला. हा दर आत्ताच्या या हंगामातला सर्वोच्च मानला जात आहे.
विठ्ठल फडतरे व रामदास फडतरे यांनी या डाळिंबाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, सुरुवातीला त्यांच्या 22 एकर शेतामध्ये उसाचे पीक घ्यायचे. मात्र उसाच्या पिकाला तुटुन जाऊन बिल येईपर्यंत दोन ते अडीच वर्ष लागायचे. अडीच वर्षांचा कालावधी खूप मोठा होता. त्यामुळे आम्ही केळीची बाग केली. दहा एकरावर केळीची बाग केली. मात्र या बागेला देखील खूप पाणी लागू लागले.
पाण्याची टंचाई भासू लागली. त्यामुळे आम्ही डाळींबाकडे वळलो. परत आपण डाळिंबाची लागवड करावी म्हणुन आम्ही परत डाळिंबाची लागवड केली. डाळिंबाला पाणी अत्यंत कमी लागते. डाळिंबाची लागवड केली, चांगल्या प्रकारे मशागत केली परिणामी यावर्षी डाळिंबाला बऱ्यापैकी भाव मिळाला. यावर्षी सुध्दा तेल्या रोगाचे प्रमाण अधिक आहे. परंतु तुलनेने बऱ्यापैकी भाव मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही डाळिंबाची लागवड केली आहे. आता हा डाळिंबाचा पाचवा बहार आहे. मागील पंधरा दिवसांपासून तोडणी सुरू असून, पुढील पंधरा वर्षापर्यंत तोडणी सुरू राहणार आहे. सरासरी 190 रुपये प्रति किलो एवढा दर मिळाला.