दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमधील विद्युत उपकरणांची चोरी करणारी अट्टल टोळी यवत पोलीसांनी आज जेरबंद केली आहे. या टोळीकडून सुमारे 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे 17 फेब्रुवारी रोजी मुठा उजव्या कालव्याच्या कडेला असणारे विद्युत रोहित्र खाली पाडून त्यातील दीडशे किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा यवत पोलीसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सचिन उर्फ गुलट्या सुभाष काळे (वय २१), आकाश उर्फ गोट्या सुभाष काळे (वय-१९, गणेगाव खालसा ता.शिरूर जि.पुणे), साहिल उर्फ नटया शैलेश सुधाकर भोसले (वय २० रा. वाखरी ता.फलटण जि.सातारा)
उमेश बलीचरण यादव (वय१९ ), गोविंद हनुमान यादव (वय२१), करिमुल्ला आतिउल्ला मनियार (वय-२२),घरभरण औंधाराम यादव (वय ३६), आकरम यासीन रगरेंज (वय ५०) सर्व रा. उत्तर प्रदेश सध्या रा. रांजणगाव ता.शिरूर जि. पुणे यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याकडून एकूण ६४ हजार ४०० रुपये किमतीचा तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत. या आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीभडक आणि राहुसह परिसरात केलेल्या तीन चोरी उघडकीस आणल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस हवालदार रमेश कदम, संदीप कदम, निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, महेंद्र चांदणे, निखिल रणदिवे, मारुती बाराते, रामदास जगताप, प्रमोद शिंदे आदींच्या पथकाने ही टोळी पकडण्याची कामगिरी केली आहे.
दरम्यान, रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहित्र चोरी करणारी टोळी जेरबंद केल्याचे समजलेने सदर ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणाऱ्या टोळीला पोलीसांनी तपास कामी ताब्यात घेतले असता त्यांनी बोरीभडक, राहू परिसरात ट्रांसफार्मर डीपी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
या आरोपींना बारामती सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 आक्टोंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कदम हे करीत असून या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.