दौंड : महान्यूज लाईव्ह
जागतिक हृदय दिनानिमित्त बुधवारी ( दि.29 ) दौंड तालुक्यातील पाटस येथे रोटरी क्लब आॅफ पाटस यांच्या विद्यमाने एक दिवसीय मधुमेह मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात पाटस परिसरातील सुमारे 102 जणांनी तपासणी केली. यामध्ये 29 व्यक्तींना मधुमेह असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले.
रोटरी क्लबच्या वतीने यासंदर्भात माहिती देण्यात आली. आरएसएसडीआय एका दिवसात 1 दशलक्ष व्यक्तींच्या रक्तातील साखरेच्या चाचण्या करून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुमारे 10 हजार डॉक्टर आणि दवाखाने या भव्य कार्यक्रमासाठी नोंदणीकृत केले गेले आहेत.
एक राष्ट्र, एक दिवस, एक दशलक्ष चाचण्या या टॅग लाईनसह हा कार्यक्रम आरएसएसडीआयच्या मार्फेत राबविण्यात येत आहे. चला मधुमेहाचा पराभव करू या मोहिमेचा हा एक भाग आहे. 1 जुलै 2021 रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी हा उपक्रम सुरू केला होता.
मधुमेहाच्या तपासणीचे महत्त्व आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमित निरीक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 100 दिवसात 100 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मधुमेहा चा पराभव ही मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये हजारो डॉक्टर या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
मधुमेहासंदर्भात जनजागृती करण्यासाठी डॉक्टर एकत्र आले आहेत. या प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम दौंड तालुक्यातील पाटस येथे बुधवारी पार पडला. दिवसभरात परिसरातील 102 लोकांनी या तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये 29 लोकांना मधुमेह असल्याचे तपासणी अहवात आढळून आले. रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र शितोळे, सल्लागार स्मिता शितोळे, अध्यक्ष उत्तम रुपनवर, सचिव अशोक बंदिष्टी, पुजा दिवेकर, नागेश्वर बोबडे, बबन म्हस्के तसेच रोटरी क्लब पाटसचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.