पुणे : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रभर गाजलेल्या ओ शेठ या गाण्याच्या संदर्भात गीतकार व गायकांदरम्यान सुरू असलेला वाद अखेर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व मनसेचे उपाध्यक्ष किशोर परदेशी यांच्या मध्यस्थीने मिटला.
हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोचला होता. त्यामुळे राज्यातील एका चांगल्या गाण्यासंदर्भात सुरू असलेल्या वादाने चाहतेदेखील निराश झाले होते. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोचला. गीतकार संध्या केशे व प्रणिकेत खुणे आणि गायक उमेश गवळी यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि यू ट्यूबवरून हे गाणे काढण्यात आले. कॉपीराईटच्या वादात तिघांचेही नुकसान झाले. ग्रामीण भागातील संगीत क्षेत्रात तरुणाईने केलेल्या एका चांगल्या कामाला गालबोट लागू नये यासाठी अखेर मेघराज राजेभोसले यांनी पुढाकार घेतला. महामंडळाच्या लवादासमोर याचा तोडगा निघाला.
या वादासंदर्भात काढलेल्या तोडग्यानंतर उमेश गवळी यांनी तिघांमधील संवाद नसल्याने चुकीची वक्तव्ये केली गेली. मात्र मनसे चित्रपट सेना, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थीने हा वाद आम्ही मिटवला असून आम्ही यापुढेही एकत्र काम करणार आहोत असे सांगितले.
दरम्यान मेघराज राजेभोसले यांनी सांगितले की, संध्या व प्रणिकेत यांनी गायक उमेश गवळी यांना ओ शेठ या गाण्याच्या निर्मितीचा व्हिडीओ करण्यास सांगितले होते. गायकाने त्यामध्ये गायन केले. यात वरील दोघेही सहभागी होते. व्हिडीओ हिट झाल्यानंतर मालकी हक्कावरून वाद झाला. आता तो मिटला आहे.