आठवड्यापूर्वीच दिल्लीत दोन दिवसांत केंद्र सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी राष्ट्रवादीच्या एका युवा आमदाराने संवाद साधला. काही कामेही लागलीच मार्गी लावली व महाराष्ट्रात चर्चेची राळ उडवून दिली. दोन दिवसांत एकापाठोपाठ एक देशाच्या राजकारणातील दिग्गजांच्या भेटींनी राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तरच नवल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय महामार्ग व रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, ग्रामविकासमंत्री गिरीराजसिंह, डॉ. विरेंद्रकुमार आदी दिग्गज मंत्र्यांच्या भेटी घेत या आमदाराने आपल्या मतदारसंघाशी निगडीत मात्र संपूर्ण देशभरात परिणाम करतील अशा विविध योजनांची मागणी केली आणि इकडे महाराष्ट्रात या वेगळ्या समाजकारणाची लागलीच चर्चा झाली.
आपल्या मतदारसंघातील मागण्यांसाठी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी हा सरकारमधील धोरणकर्त्यांना भेटत असतो. त्यात वावगे वाटायचे कारण नाही. मात्र महाराष्ट्रातील विधानसभेच्या एका युवा सदस्याने महाराष्ट्र सरकारबरोबरच थेट दिल्लीतही जाऊन केंद्र सरकारकडे मागण्या कराव्यात हा अनेकांसाठी चर्चेचा व वेगळा विषय होता. विशेषतः सत्ता ज्या पक्षाची, त्याच्या विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदाराने आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट दिल्लीपर्यंत पोचण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच वेळ असावी.
केंद्र सरकारने जी नवी अर्थरचना केली आहे, त्यामध्ये राज्यांना १० टक्के वाटा वाढवून दिलेला आहे, मात्र हे करताना त्यांनी वेळोवेळी राज्य सरकारांना करावयाच्या मदतीत हात आखडता घेतल्याचेही दिसते आहे. अशावेळेस केंद्राकडून राज्याकडे निधी येणे व तेथून तो आमदारांना मिळणे याचा ओघ मंदावला असून कोरोनानंतर तर हे स्पष्टच झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी थेट केंद्राच्या विविध खात्यांकडे आपल्या समस्या व त्यावरील उपाययोजनांसाठीचे अचूक सादरीकरण करणे हा मार्ग रोहित पवार यांनी यानिमित्ताने शोधल्याची चर्चा माध्यमकर्मींमध्ये आहे.
अर्थात या दिल्लीतील विविध ज्येष्ठ मंत्र्यांच्या भेटीनंतर त्या दिवसभरात आमदार रोहित पवार हे दिल्लीतही चर्चेच्या केंद्रस्थानी राहीले. असे काय आहे या युवा आमदारात?… संवाद साधण्याची उत्तम शैली, कामावर निष्ठा, प्रश्नांना थेट भिडण्याची सवय आणि समोरच्या प्रत्येकावर व्यक्तीमत्वाची छाप टाकताना उठून दिसणारा साधेपणा..! ज्या क्षेत्रात काम करायचे, तेथील सखोल अभ्यास व बारकावे शोधण्याची वृत्ती. हाच सखोल अभ्यास त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे निमित्त ठरला असावा.
आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा विचार करताना देशाच्या पातळीवरही लक्ष ठेवणारा हा नेता यामुळे सर्वांच्याच लक्षात आला. रोहित पवार यांच्या या दौऱ्यामागे पत्रकारांची मते वेगवेगळी आहेत. कदाचित राज्य सरकारच्या योजना तर मतदारसंघात आणता येतातच, मात्र कोरोनाच्या काळात थंडावलेले अर्थकारण लक्षात घेत फक्त राज्यांतील योजनांपुरते मर्यादित न राहता केंद्र सरकारकडील निधी आणि त्यांच्या विशेष योजनांचाही अतंर्भाव करण्याचा पवार यांचा विचार असावा. त्यादृष्टीनेही या दौऱ्याचे फलित वेगळे ठरले.
विकासाचा विषय समोर येतो, तेव्हा कोणताही राजकीय अभिनिवेश, राजकीय स्पर्धा न बाळगता विरोधकांशीही उत्तम संपर्क, संवाद आणि तेथूनही कामे करून घेण्याचा हातखंडा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे आहे. ते यासाठी ओळखले जातात. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातील ज्या काही मोजक्या नेत्यांनी हा वारसा चालवला, त्यामध्ये रोहित पवार यांचेही नाव आता अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे चित्र आहे. शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्र ओळखणारे नेते आहेत.
राज्यातील व देशातील कोणत्याही व्यक्तीची खडानखडा माहिती पवारसाहेबांना असते. सध्याचा काळ सोशल मिडीयाचा आहे. प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मिडीयाच्या सहाय्याने तळागाळापर्यंत थेट पोचता येते, याचे भान रोहित पवार यांना खूप लवकर आल्याने त्यांनी त्या माध्यमाचा अत्यंत चपखल वापर केला आणि त्यांनी नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत, शाळेच्या मुलापर्यंत आपुलकीचे नाते जोडले.
आज रोहित पवार हेही महाराष्ट्रातील तरूण कार्यकर्त्यांची खडानखडा माहिती ठेवून आहेत. त्यांची ही पध्दत अगदी विरोधकही मान्य करतात. त्याची अगदी दिल्लीतही चर्चा झाली आणि हा महाराष्ट्रातील एक नवखा आमदार दिल्लीतही चर्चेचा विषय राहीला. ग्रामीण भागात ज्याप्रमाणे राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, त्यानुसार शहरी भागासाठी शहरी रोजगार हमी योजना सुरू करावी हा एक वेगळा विषय या आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मांडला आणि साहजिकच त्याची चर्चाही झाली.
दारीद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेत नगर जिल्ह्याचा समावेश व्हावा, शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरल अर्बन मिशन अंतर्गत एकात्मिक विकास प्रकल्पाचा मतदारसंघासह नगर जिल्ह्याचा समावेश व्हावा, राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार मानण्यासाठी घेतलेली भेट अशा विविध कारणांची कारणमिमांसा करताना आपसूकच लक्ष मागील दोन वर्षांच्या प्रवासाकडे जाते.
दोन वर्षे होत आली, विधानसभेच्या निवडणूकीत राज्यात ४५ जण युवा व त्यापैकी काही नवखे आमदार निवडून आले. काहीजणच पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. या आमदारांमध्ये एक नाव वेधक होते… रोहित सुनंदा राजेंद्र पवार…! सभागृहात शपथ घेतानाच अनेकांच्या ते लक्षात आले. आपली वेगळेपणाची झलक दाखवलेल्या या उच्चशिक्षित चेहऱ्याने प्रतिकूल मतदारसंघात पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला आणि या आमदाराच्या साधेपणाने राज्यातील तरुणाई आपसूकच त्यांच्या प्रेमात पडली..! राजकारणात नेहमी केंद्रस्थानी असलेल्या पवार कुटुंबियांची ही चौथी पिढी..
व्यावसायिकतेमुळे प्रत्येक गोष्ट मुळापासून समजून घेण्याची वृत्ती.. सृजनशील, सर्जनशील, संवेदनशील स्वभाव आणि कितीही उंची गाठली, तरी जमीनीवर राहण्याची स्वभावशैली.. त्यामुळेच तरुणाई आपले भविष्य ज्यांच्यात पाहते… तेच राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित राजेंद्र पवार…! तमाम जनतेच्या या लाडक्या रोहितदादांचा आज वाढदिवस आहे..!
भावनिक मुद्द्यावर राजकारण करण्याचे दिवस संपले. आता जमीनीवर राहून जनतेचे असलेले मूलभूत प्रश्न व त्यांच्या अपेक्षा यांचा अचूक वेध घेऊन त्यानुसार जे काम करतात, ते आता नेते बनत आहेत. लोकांच्या अपेक्षा आणि प्रश्न नेमके काय आहेत, याचा शोध घेत सर्वेक्षणे करून देणाऱ्या चाणक्यांना राजकारणात किंमत आली आहे.
अशा कोणत्याही चाणक्याची मदत न घेता या नव्या पध्दतीचा सखोल अभ्यास करून आपल्या मतदारसंघाचा स्टॅटिकल डाटा गोळा करून त्याआधारे काम करण्याचा प्रयत्न रोहित पवार करीत आहेत. एवढे प्रचंड कष्ट घेणारा आमदार आता सापडणेही मुश्कील आहे. रोहित पवार चर्चेत आले ते, पुणे जिल्हा परिषद निवडणूकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजय मिळवल्याने.. तेथेही त्यांनी समाजाच्या कळीचे मुद्दे हातात घेतले. जलसंधारण, शेती, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा व सबलीकरण या निकडीच्या विषयावर मोठे काम केले.
यासाठी राज्यभर या युवा नेत्याने पायपीट केली. प्रश्न समजून घेतले आणि लोकांच्या नजरेत हे युवा नेतृत्व चमकले. उत्तम संघटन, वक्तृत्व, हजरजबाबीपणा आणि माणूसकीची संवेदनशीलता उभ्या महाराष्ट्राने रोहित पवार यांच्यात अनुभवली…आणि झेडपीचे समाजकारण नगर जिल्ह्यात पोचले. सातत्याने दुष्काळाचे चटके अनुभवलेला कर्जत – जामखेड मतदारसंघ. तेथील मूलभूत गरजा व प्रश्नांशी रोहित पवार थेट भिडले.
पारंपारिक राजकारणाला बगल देऊन विकासाची नवी गणिते मांडणारा हा लोकप्रतिनिधी लोकांना आपलासा वाटला. महिला सक्षमीकरणासाठी आयुष्य वाहिलेल्या सुनंदा पवार व शेतीतील नवे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी झटणारे वडील राजेंद्र पवार यांचे रोहित हे अपत्य. आजोबा शरद पवार हे देशाच्या राजकारणातील मोठे नेते. आजोबा पद्मश्री अप्पासाहेब पवार यांचे कृषी योगदान सुपरिचित. चुलते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेतृत्व. तर आत्या सुप्रिया सुळे यांचे देशपातळीवरील समाजकारण सुपरिचित.
कर्जत, जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर रोहित पवार निवडून आले आणि त्यांनी पारंपारिक राजकारण, समाजकारणाला फाटा देत नवीन मार्ग शोधला. या मार्गाचे नाव आहे कर्जत-जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (kjidf).
तालुकास्तरावर फक्त शासनाच्या योजना राबविणे एवढेच लोकप्रतिनिधीचे काम मर्यादित न ठेवता सर्वांगिण विकासासाठी लोकसहभाग, दातृत्वाची मदत घ्यायची आणि शिक्षण, शेती, महिला सबलीकरण, सक्षमीकरण, पिकनिहाय योजना, पाणी, रस्ते, उद्योग, स्वयंरोजगार, शेतीपूरक व्यवसाय, जलसंधारण, नदीसंवर्धन, धार्मिक पर्यटन अशा विषयांवर काम करायचे ही त्याची थोडक्यात संकल्पना आहे. गावाकडून शहराकडे कामासाठी गेलेल्यांना आपल्या गावाविषयी ममत्व जागवण्याचा, विकासासाठी पुढे येण्यासाठीचा हा एक पर्याय. आज या केजेआयडीएफच्या माध्यमातून लोकहिताशी निगडीत ७६ हून अधिक प्रकल्प चालतात.
रोहित पवार यांनी राज्यस्तरीय दिलेले योगदान
रोहित पवार यांनी मतदारसंघातील युवा, कष्टकरी, नोकरदार वर्गाबरोबरच राज्यातही प्रभाव पडणाऱ्या प्रश्नांचा रोहित पवार यांनी इतर लोकप्रतिनिधींसह पाठपुरावा केला. काही प्रश्नांमध्ये त्यांनी थेट पाठपुरावा केला. मात्र या सर्वांची सरकारने दखल घेतली व त्यात यशही आले.
तीन वर्षे रखडलेली पोलिस भरती, सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर १२ हजार ५३८ पदभरतीची सरकारने घोषणा केली. महाज्योती संस्थेच्या स्थापनेसाठी, माळढोक अभयारण्याच्या इकोसेन्सिटिव्ह झोनचे अंतर कमी करण्यासाठी पाठपुरावा केला.
ठिबक सिंचन अनुदानवाढीच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी १०७ तालुक्यांतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के, इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानाची घोषणा झाली. खासगी दवाखाने कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची मागणी असेल किंवा शैक्षणिक शुल्क कमी करण्याचा अथवा हप्ते देण्याचा विषय असेल, त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला.
तरुणांच्या रोजगारासाठी स्वतंत्र पोर्टलची मागणी केली, अन औद्योगिक कामगार सुविधा पोर्टल, यश महाजॉब्ज पोर्टल सुरू झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी दिड कोटींचा निधी सरकारकडून मंजूर झाला. तर हवामानाधारीत फळपिक विमा योजनेत लिंबू व पेरू यांचा समावेश झाला. कोरोनाच्या काळात वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीसाठी धमक्या व दहशतीसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय रोहित पवारांच्या पाठपुराव्याचे फलित होते.
डबेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी असेल, बालभारतीची स्वतंत्र वाहिनी, रमाई आवास योजनेच्या प्रलंबित अनुदानाचा पाठपुरावा करण्यात ते अग्रभागी राहीले. जनहितासाठी दक्ष राहण्याचा मूलतःच स्वभाव असल्याने कोरोनाकाळात ६० हजार लिटरहून अधिक सॅनिटायझर राज्यभर वितरित केले. कोविड काळात व पूरग्रस्त भागात १०० टनांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
त्यांनी राज्यात ग्रामीण भागात सर्वात अगोदर जंबो कोविड सेंटर उभारले. कर्जत व जामखेडमध्ये १२०० बेडच्या या सेंटरच्या क्षमतेमुळे नागरिकांचा कोट्यवधी रुपयांचा खासगी दवाखान्याचा खर्च वाचला. शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केल्यानंतर सरकारने त्याची दखल घेत तालुकास्तरावर शिवभोजन केंद्रांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. सलून व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी रोहित पवार यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधींनी मागणी केली आणि सरकारने त्याची दखल घेतली.
शेती हा कर्जत-जामखेड तालुक्यांचा आत्मा. २५ ते ३० दिवसांचा पावसाळा व जेमतेम ४०० मिमी पाऊस. त्यामुळे शेतीसाठी मुळापासून काम करण्यास सुरवात केली आहे. पेरले की उगवतेच यावर विश्वास असणाऱ्या या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांना कांद्याच्या पिकाबाबत स्वयंपूर्ण करायचे ठरवले. तो देशातील सर्वात मोठा प्रयोग येथे सुरू आहे.
तब्बल ६०० टन बिजोत्पादन या प्रयोगात झाले असून बियाणे विकत घेण्याची वेळ पुढील काळात शेतकऱ्यांवर येणार नाही व ते स्वयंपूर्ण होतील. दुप्पट उत्पादनाच्या तंत्रासाठी खरीप, रब्बी पिकांचे नियोजन येथे केले जात आहे. वाण, बियाणे, तंत्र, लागवडीची पध्दत यावर बारकाईने लक्ष दिल्याने येथील शेती हळूहळू बदलू लागली आहे.
रोहित पवार निवडून आले. मग दोन वर्षात झालं काय?
रोहित पवार यांनी मतदारसंघाला नवी ओळख द्यायचे ठरवले. आज ते राज्यात कोणतेही काम करताना कर्जत-जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे नाव पुढे करतात. ज्यातून अप्रत्यक्षपणे त्यांच्या मतदारसंघाची ओळख राज्यभर आपोआप होते. यातून झाले काय की, पूर्वी कर्जत म्हटले की, रायगड जिल्ह्यातील कर्जत नजरेसमोर यायचे.
आता मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड हे तालुके अधिक ठसठशीत लोकांपुढे उभे राहतात. येथे होणाऱ्या रस्त्यांचा दर्जा चांगलाच असायला हवा याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. कामे फक्त नावापुरती व ठेकेदार जगविण्यासाठी होतात, अशी टिका येथे निश्चितच होणार नाही.
गावातील तलाठी, कृषीसेवक, ग्रामसेवक, रोजगारसेवक, वायरमन हे गावात वेळेवर आले की, लोकांची कामे वेळेत होतात. गावपातळीवरील प्रशासन आता अधिक कार्यक्षम झाले आहे. कायदा – सुव्यवस्थेच्या बाबतीत खासगी सावकार असो की, कोणतीही अन्यायकारक घटना असो, अन्यायाचे निवारण तातडीने होत असल्याने आता कर्जत, जामखेड राज्यभर चर्चेत आहे.
भरोसा सेल हे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात सर्वाधिक यशस्वी याच मतदारसंघात झाले आहे. पाणंद रस्ता नसल्याने रुग्ण दगावले, प्रसूती वेळेत झाली नाही, बाळ दगावले अशा घटना जिथे ऐकायला मिळाल्या, तिथे आता ५०९ किलोमीटरचे पाणंद रस्ते आकाराला आले आहेत. कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत.
धार्मिकतेचं महत्व सांगणाऱ्या या तालुक्यांमुळेच आज राज्यात सृजन भजन स्पर्धा ही महत्वाची बनली. इथल्या संत, महंतांच्या विचारांची जनजागृती राज्यभर सुरू आहे. स्वराज्याची शेवटची लढाई लढलेल्या खर्ड्याच्या किल्ल्याचे ब्रॅण्डींग संपूर्ण देशात करणारा स्वराज्य ध्वज येथे आकाराला येतोय.
एकूणच आपण ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो, त्या मतदारसंघातील गरजा भरून काढण्यासाठी उसंत न घेणारा हा युवा लोकप्रतिनिधी आता राज्यातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे आणि त्यासाठी पारंपारिक राजकारणाच्या पायघड्यांवर न चालता एक नवी समाजकारणाची पायवाट तयार करतो आहे..!
रोहित पवार – इथे सदा सर्वकाळ राजकारण करून चालत नाही. सामाजिक हितच पाहावे लागते. लोकांना माझ्यामध्ये एक पर्याय दिसला. त्यांना जुनाट वाटा मोडायच्या होत्या. कर्जत-जामखेडने पहिल्या प्रयत्नात स्विकारले. जनतेने मला एक नवी ओळख मिळवून दिली. कर्जत जामखेड मधील प्रश्नांचे गांभिर्य पाहिले, तेव्हाच येथे कामाला वाव आहे हे लक्षात आले. इथे सारेजण प्रामाणिक आहेत. त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास साधण्याची गरज आहे. कालचे चित्र आपण बदलू शकतो असा विश्वास लोकांना दिला आणि अनेक वर्षांची दुरवस्था बदलण्यासाठी त्यांनी परिवर्तन केले. आज येथे आव्हानांपेक्षा कामाची संधी खूप आहे. मी कार्यरत आहे, कार्यरतच राहील. सारेजण मनापासून साथ देताहेत. बदल घडतो आहे आणि विकासाची पावले उमटत आहेत. !