करमाळा : महान्यूज लाईव्ह
बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला मनोहर भोसले याला खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावरून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी संपताच तपासासाठी पुन्हा मनोहर भोसले याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एक ऑक्टोबर पर्यंत त्याची न्यायालयीन कोठडी असेल.
बारामतीतील अंधश्रद्धाविरोधी कायद्यातील गुन्ह्यामध्ये तपास झाल्यानंतर करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले याला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्याला पहिल्यांदा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर व वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान नव्याने मनोहर भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ नयेत, यासाठी मनोहर भोसलेचे काही भक्त सक्रिय असून जे लोक तक्रार देण्यास येणार होते, त्यांची मनधरणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी ताकद लावली आहे.