इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेच्या पाण्यात पाय घसरुन पडलेल्या दोन वर्षाच्या शौर्य चव्हाण या चिमुकल्यास बारावीत शिकणाऱ्या समर्थ शिंदे या तरुणाने नागरीकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न करता वितरिकेत उडी घेऊन चिमुकल्या शौर्य चव्हाण ला सुरक्षीत बाहेर काढले.
नुकत्याच घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच त्याच्या धाडसाचे कौतुक करत निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी शिंदे आणि चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन समर्थ शिंदेचा यथोचित सन्मान केला.
उदमाईवाडी (ता.इंदापूर) जवळील नीरा डाव्या कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेच्या पाण्यात चिमुरडा शौर्य पडला होता.ही घटना बुधवारी (ता.१५) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. लहान शौर्य चव्हाण व त्याचा अडीच वर्षाचा चुलत भाऊ कृष्णा चव्हाण खेळत-खेळत वितरिकेच्या जवळ गेले होते.
अचानक शौर्यचा पाय घसरल्याने शौर्य वितरिकेच्या पाण्यात पडला होता.यावेळी वितरिकेजवळून इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारा समर्थ शिंदे हा तरुण व्यायामासाठी चालला होता.नागरिकांच्या ओरडण्याचा आवाज कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता वितरिकेमध्ये उडी टाकून त्याने छोट्या शौर्यला पाण्यातून अलगद बाहेर काढले होते.
समर्थच्या तत्परतेमुळे एका चिमुरड्याचा जीव वाचला होता. प्रसंगावधान दाखवून समर्थने दाखवलेल्या धाडसाचे राजवर्धन पाटील यांनी कौतुक केले व त्याचा शाल, श्रीफळ, फेटा देऊन सत्कार केला.