दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भुईंजच्या वनविभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पिकअप सह 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व चालकावर गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळे अनाधिकृत वृक्ष तोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले. भुईंज वन विभागातील वन परिमंडळाचे वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक संजय आडे, रजिया शेख या कर्मचाऱ्यांना 26 सप्टेंबर रोजी भुईंज (ता. वाई) येथील नामदेव अधिकराव राठोड हा आपल्या मालकीच्या असणाऱ्या पिकअप (क्रमांक HM.46.E.4695) मधून भुईंज गावच्या हद्दीत संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली.
राठोड हा वन विभागाची कसलीही परवानगी न घेता लिंबाच्या झाडाची तोड करून मालाची वाहतूक करणार असल्याची माहिती वरील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत मिळाली होती. ही खबर मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुईंज चिंधवली (ता.वाई) जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी पाच वाजल्यापासूनच फिरती तपासनी च्या नावाखाली सापळा लावला होता.
या सापळ्यामध्ये रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नामदेव अधिकराव राठोड (रा. भुईंज ता. वाई) हा सापडला. पिकअप गाडीतून लिंबाची लाकडे भरून भुईंज चिंधवली रस्त्याने जात असताना वनविभागाचे कर्मचारी संग्राम मोरे, संजय आडे, रशिया शेख यांनी पिकप चालक नामदेव राठोड त्याच्याकडे लाकूड वाहतुकीची परवानगी आहे का असे विचारले.
त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी या तिघांनी पिकअप ताब्यात घेऊन तपासणी केली. असता त्यामध्ये लिंबाचे झाडाचे लाकडे असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ लाकडा सह पिकअपचा पंचनामा करून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल.
नामदेव अधिकराव राठोड याच्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिना भरापासून भुईंजच्या वन विभाग कर्मचाऱ्यांनी असले, पाचवड, अमृतवाडी, आणि भुईंज या परिसरात विनापरवाना होत असलेल्या लाकडांच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवली होती.
ही कारवाई सातारा येथील उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनावले, वाई वन विभागाच्या महिला वनक्षेत्रपाल असलेल्या स्नेहल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भुईंज च्या वनविभागाच्या कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.