किशोर भोईटे ,महान्यूज लाईव्ह
जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण योजनेचा आज जाचक वस्ती येथे श्रीराज भरणे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने लाळ खुरकत रोगाची लक्षणे दिसू लागतात. म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण अभियान संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येत आहे. लाळ खुरकत रोगात जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते, जनावरे वैरण खात नाहीत, बहुतांश वेळी पायाच्या नख्यांमध्ये जखमाही होतात. तोंडात गरे ( जखम) पडतात. यातून अनेक वेळा जनावरे दगावतात. ही दगावलेली जनावरे शेतकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर न टाकता जमिनीत खड्डा घेऊन दफन करावीत. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढत नाही तसेच या रोगाला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी या लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन श्रीराज भरणे यांनी केले.
यावेळी उपस्थित शेतकर्यांना पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नलगे यांनी या रोगाविषयी माहिती दिली. यावेळी जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, सरपंच सुशील पवार, सणसर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नलगे , अॅड विलास खटके, शंकर पवार, नवनाथ पवार, गजानन पवार, संजय काळे, विशाल काळे, महेश निंबाळकर, निळकंठ पवार, अनीकेत निंबाळकर, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.