सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मागील अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या साखळीच्या गोदामाला पावसाने झटका दिला कारखान्याच्या उभारलेल्या तात्पुरत्या गोदामांपैकी तिसऱ्या क्रमांकाचं गोदाम काल पावसात कोसळलं.. दरम्यान या घटनेत साखर पोती भिजल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला असून कारखान्याने मात्र यात नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काल सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी आलेल्या पावसात गोदामातील कुजलेल्या लाकडी बांबूंमुळे गोदाम कोसळले. मागील अवकाळी पावसात साखरेची कच्च्या साखरेची पोती असलेली दोन मोठी गोदामे अवकाळी पावसाच्या भक्ष्यस्थानी सापडले होते आणि यात हजारो साखर पोती भिजली होती. त्यामुळे सोमवारच्या देखील घटनेत गोदाम पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, संबंधित तिसऱ्या क्रमांकाच्या गोदामाची मुदत संपली होती. या गोदामाची डागडुजी करण्यासंदर्भात प्रस्ताव देखील संचालक मंडळाने मंजूर केला होता. परंतु त्यापूर्वीच हे गोदाम कोसळले. अर्थात या गोदामातील साखरेचे लिफ्टींग पूर्ण होत आले होते. गोदामात डॅमेज शुगर होती, ती देखील दीड हजारा पिशवीपेक्षा जास्त नव्हती, काल पावसाचा जोर नव्हता, त्यामुळे ज्या भागात गोदामात साखर आहे, त्या ठिकाणी कोणतेही नुकसान झाले नाही.
दुसरीकडे या घटनेवरून काही विरोधक सभासदांनी मात्र भीती व्यक्त केली असून, गोदाम उभारणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे जर छत्रपती कारखान्याचे नुकसान होत असेल, तर यामध्ये ऊस उत्पादकांचा काय दोष आहे? अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला असून कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.