दौंड : महान्युज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील यवतजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात चुलता पुतणीचा जागीच मृत्यु झाला, तर दुसरा चुलता या अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
जखमींना उपचारासाठी यवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती यवत पोलीसांनी दिली. नाना आप्पा करे (वय 53) कु.राधा बापु करे (वय 30 ) अशी या अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे असून तर दादा साहेबराव करे (सर्व रा.मोरगांव, पळशी, ता.बारामती, जि.पुणे ) हे या अपघात गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी ( दि.27 ) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास यवत हद्दीतील महती कंपनीच्या समोर हा अपघात झाला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजुकडून सोलापुर बाजुकडे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन अपघात केला.
अपघातानंतर हे वाहन भरधाव वेगाने निघून गेले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत गेना नाना करे यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे हे करीत आहेत.