विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : चोरट्यासह चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफाला लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडकी (ता. हवेली) येथून अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
शाहरूख विजय पवार (रा. आटपाडी, जि. सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. तर प्रकाश रावसाहेब काकडे (रा. यपावाडी ता. आटपाडी जि. सांगली) असे अटक केलेल्या सराफाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन घरफोड्यात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सदर घरफोडीच्या तपासाचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पथकातील नितीन गायकवाड व सुनिल नागलोत यांना सदरची चोरी शाहरुख पवारने केल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून शाहरूख पवार यांस लोणीकाळभोर येथून ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने वरील दोन्ही घरफोड्या त्याचा भाऊ देवगण विजय पवार आणि तात्या वसंत शिंदे यांच्या मदतीने केली असल्याची कबुली दिली. तर चोरलेले दागिने प्रकाश काकडे या सोनारास विकले असल्याचे सांगितले.