माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २७ – राजगड सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून उस गाळपाचे तीन लाख मेट्रीक टनाचे उद्दिष्ठ असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी सांगत गाळप क्षमता विस्तारवाढ, डिस्टीलरी प्रकल्प, १८ मेगॅवॅट क्षमतेचा प्रकल्प या तिन्हीचे आराखडा तयार असून शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती थोपटे यांनी दिली.
राजगड सहकारी कारखान्याची वार्षिक सर्वसारण सभा सोमवारी दि. २७ रोजी धांगवडी ( ता. भोर ) येथील छ. शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑंनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री अनंतराव थोपटे, उपाध्यक्ष विकास कोंडे, कार्यकारी संचालक सुनिल महिंद, सर्व संचालकासह अधिकारी व कर्मचारी ऊस तोडणी मजूर मोजक्या संख्येत उपस्थित होते. यावेळी आबासाहेब यादव, अशोक पांगारे, सचिन बाठे, संदीप जेधे, नितीन जेधे, गणपतराव कंक, राजेंद्र मोरे या सभासदांनी सूचना मांडल्या.
आमदार संग्राम थोपटे पुढे म्हणाले कि, कारखाना युध्दपातळीवर सुरू करण्यासाठी १५० ट्रॅक्टर्सना व ५० युवराज यंत्रणेला अॅडव्हान्स वाटप केले आहे. नीरा देवघर धरणाच्या डावा कालव्याचे पाणी कार्यक्षेत्रात फिरणार असल्याने उस पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. आपला कारखाना आहे, ही भावना ठेवून नोंदलेला ऊस कारखान्यास घालावा. शेअर्स रक्कम १० हजारावरून १५ हजार वाढ केली असल्याची माहिती देत थोपटे यांनी यावेळी नाटंबी येथील नोंदलेला सर्व ऊस राजगड साखर कारखान्यास गाळपास दिल्याबददल तेथील ऊस उत्पादकांचे त्यांनी अभिनंदन केले.