पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नीरा परिसरात छापे टाकून मोठी कारवाई केली. महिने या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुणे विद्यापीठासह इतरही जिल्ह्यातील बनावट प्रमाणपत्र व गुणपत्रिका बनविण्याची टोळी येथे सक्रिय होती.
स्थानिक गुन्हे शाखेने निरा येथे धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले असून, यामध्ये गणेश संपत जावळे (राहणार नीरा, ता.पुरंदर) मनोज धुमाळ (राहणार नीरा) व वैभव लोणकर (बारामती) या तिघांचा समावेश आहे.
हे तिघे जण विद्यापीठासह अन्य महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवत असल्याचा संशय पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून या पथकाने पाळत ठेवली होती.
दरम्यान या तिघांना अटक केली असून पुढील तपास जेजुरी पोलिस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
त्यावरून त्यांनी अगोदर विद्यापीठात चौकशी केली तपास केला व त्यानंतर निरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेस मध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर या ठिकाणी पथकासह धाड टाकली असता मोठ्या संख्येने बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनविण्याची प्रक्रिया सुरू होती.