अवैध वाळू वाहतूकदारांचा बीमोड करणार — तेजस्वी सातपुते
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाळू माफियांनी अवैध वाळूने भरलेला पिकअप भरधाव वेगाने लोक अदालतच्या समन्स बजावणीच्या कामाकरिता गेलेल्या मंगळवेढ्याच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर घालून ठार केले. ही घटना शनिवारी (दिनांक 25 ) गोणेवाडी ते शिरसी रोडवर घडली.
गणेश प्रभु सोलनकर (वय ३२) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विनापरवाना वाळू वाहतूक चालक, साथीदार व त्या गाडीचा मालक या तीन जणांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेनंतर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांचा बिमोड करण्याचा इशारा ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
गणेश सोलनकर हे रस्त्यावर मोटारसायकलवर थांबले असता अवैधरित्या वाळूच्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. हा अपघात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी ते शिरसी रोडवर दि. २५ रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याचा सुमारास वेताळ मंदिरासमोर घडली.
मिळालेल्या माहिती नुसार पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभु सोलनकर लक्ष्मी – दहिवडी येथील बिट नेमणुकीस होते. बीटमधली लोक अदालत च्या समन्स बजावणीच्या पोहोच आणण्याकरिता ते गेले होते. दरम्यान सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास गावातील पोलीस पाटील संजय मेटकरी यांना फोन करून नोटीस घेऊन गावात या असे कळवले होते. त्यांनी मेटकरी यांना गोणेवाडी स्टँडवर जवळील हटसन डेअरीजवळ येण्यास सांगितले होते.
मेटकरी गावातील नवनाथ मासाळ यांना मोटारसायकलवर घेऊन हॅटसन डेअरी जवळ आले. त्यावेळी सोलनकर हे रस्त्याच्या बाजूला मोटारसायकल थांबवून ते गाडीवर बसलेले होते. त्याच सुमारास मेटकरी यांच्या पाठीमागून आलेल्या व शिरसीचा दिशेने निघालेल्या वाळूने भरलेला पांढऱ्या रंगाचा बिगर नंबरचा पिकअप अतिशय वेगाने येत होता.
सोलनकर यांनी उजव्या हाताने थांबण्याचा इशारा केला होता. त्याचवेळी सोलनकर यांना मारण्याचा उद्देशाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सोलनकर यांना मंगळवेढा येथील रूग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या वृत्ताची खबर मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सांगोल्याचे पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. बी. पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
संशयित तीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून या घटनेनंतर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांचा बिमोड करण्याचा इशारा ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. गणेश प्रभु सोलनकर हे मुळचे बुरलेवाडी (ता.सांगोला) येथील मुळ रहिवासी असून ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गेली दहा वर्ष ते पोलीस सेवेत होते. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, तीन बहिणी असा परिवार आहे.