विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : देशात सुरू असलेल्या आयपीएलच्या दरम्यान सट्टा लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन क्रिकेट बुकिंग कडून पुणे पोलिसांनी एक कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केले आहे या दोन बुकींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
या कारवाईत पुणे पोलिसांनी सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दरम्यान सुरू असलेल्या तपासामध्ये या बुकिंग कडून काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या नोंदी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत दरम्यान या प्रकरणात आणखी ही काही नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पुण्यात आयपीएल सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाल्यावरून पोलिसांनीही धडाकेबाज कारवाई केली. यामध्ये पुण्यातील समर्थ आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मधील भुतडा हा देशातील आंतरराष्ट्रीय बुकी समजला जातो.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे गुन्हे शाखेच्या प्रभारी अप्पर आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रविवारी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली.
दरम्यान या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यासह मुंबईतील काही बुकी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिस करत आहेत.