
बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणदरे येथील मंगेश प्रतापराव जगताप व राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून पराभूत झालेले ॲड. वसंतराव बापूराव गावडे यांना संधी दिली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी मंगेश जगताप व जगताप परिवारास कारखान्यावर स्वीकृत संचालक पदी संधी देऊ असे आश्वासन दिले होते. तत्पूर्वी प्रतापराव जगताप यांनी विरोधकांच्या पॅनेलमधून उभे न राहण्याची भूमिका घेतली होती, त्यांना विरोधकांकडून निमंत्रण होते, परंतु त्यांनी ते नाकारले, ते लक्षात घेऊन अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
ॲड. वसंतराव बाबुराव गावडे हे राष्ट्रवादीच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलमधून निवडणुकीसाठी गुणवडी गटातून उभे होते, परंतु त्यांचा अटीतटीच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांना या वर्षासाठी संचालक पदाची जबाबदारी दिली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनेलमधून पराभूत झालेल्या इतर उमेदवारांनाही यापुढील काळात संधी मिळेल असेच दिसते.
दरम्यान आज गावडे व जगताप यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व बारामती तालुका दुध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी या दोघांची पक्षश्रेष्ठींनी दिलेली नावे जाहीर केली. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी व संचालकांनी मान्यता देत दोघांचीही स्वीकृत संचालक पदी एकमताने निवड केली.










