नगर : महान्यूज लाईव्ह
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा राज्यात सध्या कर्जतचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.. आतापर्यंत अनेकांनी पोलीस काय करू शकत नाहीत हे पाहिलेच असेल; पण आता पोलीस काय करू शकतात? याचा मूर्तिमंत धडा या कर्जत पोलीस ठाण्याने संपूर्ण राज्याला दिला आहे. एरवी गावात धिंगाणा घालणारा माणूस पोलिसांना दिसतच नाही, रस्त्यात आडवा येणाऱ्या गायी, जनावरे सुद्धा पोलिसांना दिसत नाहीत, सावकार अन्यायकारक पद्धतीने जमिनी बळकावतो; माणसांना लुटतो..! त्यावरही फार काही होत नाही पण या सगळ्यांना फाटा दिला आहे, तो कर्जतच्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे..!
काही दिवसांपूर्वीच रस्त्यात भटक्या गायी सोडणाऱ्या मालकांना फार मोठा दणका कर्जत पोलिसांनी दिला एकत्र करून त्या पांजरापोळ आत नेऊन सोडले आणि या गाई ज्यांच्या असतील त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल याची तरतूद करून ठेवली. त्यामुळे गाई माझी आहे असे सांगायचे तरी पंचायत; गाई माझी नाही असे सांगायचे तरीही पंचायत! असा प्रकार पोलिसांनी पहिल्यांदा सर्वांच्या लक्षात आणून दिला. रस्त्यावर भटक्या सोडलेल्या गाईंच्या बाबतीत देखील पोलीस काय करू शकतात याचा धडा कर्जत पोलिसांनी दाखवून दिला.
आज कर्जत पोलिसांनी खाजगी सावकारावर आणखी एक कारवाई केली. सावकाराने स्वतःच्या नावावर करून घेतलेली जमीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या खंबीर भूमिकेमुळे शेतकऱ्याला परत मिळाली. वडगाव तनपुरा येथील बाळासाहेब पांडुरंग भोंगे या शेतकऱ्याने एकाच सावकाराकडून कर्ज घेतले होते. सन 2017 मध्ये 2 लाख 50 हजार रुपये प्रति महिना अडीच रुपये व्याजदराने भोंगे यांनी घेतली होती.
आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने भोगे यांना सावकाराला लगेच रक्कम देता आली नाही. मात्र सावकाराने, माझे पैसे दे, नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे, असा तगादा लावला. त्यामुळे नाईलाजास्तव बाळासाहेब भोगे यांनी ‘पैसे दिल्यानंतर माझी जमीन मला परत द्यावी’ या बोलीवर एक एकर जमीन सावकाराच्या नावावर करून दिली.
त्यानंतर पूर्ण रक्कम देण्यास तयार असताना देखील सावकार जमीन परत करण्यास नकार देत होता. मला जमीन विकायची आहे. तुला जर हवी असेल, तर आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागतील, तरच मी तुला ती जमीन देईल’ असे सावरकराने सांगितले. संबंधित जमिनीची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत नऊ ते दहा लाख रुपये होत असल्याने एवढी रक्कम भोगे यांना शक्य नव्हती. त्यामुळे त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सारी हकीकत सांगितली.
यादव यांनी संबंधित सावकाराला बोलावून घेतले आणि ‘तू फिर्यादीकडून घेतलेली जमीन त्यांना परत कर, नाहीतर तुझ्यावर सावकारी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होईल’ असे सांगितल्यानंतर सावकार भानावर आला आणि अडीच लाख रुपये मुद्दल रक्कम घेऊन एक एकर जमीन परत देण्यास त्याने होकार दिला. 16 सप्टेंबर रोजी सावकाराने भोगे यांची जमीन त्यांच्या नावावर पुन्हा करून दिली.