माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २५ – वडील आजारी असल्याने गावाकडे जाण्यासाठी मित्राकडे उसने पैसे घ्यायला निघालेल्या चायनीज खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कामगारांवर दोन अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन टोकदार हत्याराने हल्ला केला व त्यांच्याकडील १० हजार रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनुपम जयस्वाल वय २५ रा.किकवी, ता. भोर मुळ रा. उत्तरप्रदेश) असे हल्ला झालेल्या चायनीज कामगाराचे नाव असून ही घटना किकवी येथील कृष्ण हॉटेल पासून काही अंतरावर पुणे सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावर दि. २५ रोजी रात्री पावणे बारा वाजण्याचे सुमारास घडली आहे.
याप्रकरणी त्यांचे मित्र भगवानदीन शोभाराम सोनी यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मित्र अनुपम जयस्वाल हे त्याच्याकडे उसने पैसे घेण्यासाठी पायी चालत येत असताना त्यांना २५ ते ३० वयाचे दोन अनोळखी चोरट्यांनी रोडवर अडवून पैशाची मागणी केली.
त्यावेळी अनुपम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यातील एकाने अनुपम यांना पाठीमागून पकडून त्यातील दुसऱ्या चोरट्याने कटरसारखे टोकदार हत्याराने अनुपम यांचे छातीवर तसेच पोटात मारून गंभीर जखमी केले. यावेळी चोरट्यांनी अनुपम यांच्या शर्टच्या खिशातील रोख १० हजार आणि मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन शिरवळ बाजूच्या दिशेने दुचाकीवरून आरोपींनी पलायन केले.