लोकप्रतिनिधी व प्रशासन नेमके कधी लक्ष देणार..?
बीड : महान्यूज लाईव्ह
गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील पुलाने आणखी एक बळी घेतल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
भोजगाव येथील निकिता संत या मुलीच्या सावडण्याचा कार्यक्रम आज होता आणि त्यानिमित्त नातेवाईकांसह सुदर्शन संदिपान संत ( ३८ ) हे देखील तिथे आले होते. मात्र तिथे जाण्यासाठी भोजगाव येथील वाहुन गेलेला पुल ओलांडून जावे लागते.
पुलावरून जात असताना सुदर्शन संत यांचा पाय घसरून तोल गेला व ते अमृता नदीमध्ये पडले. ग्रामस्थांनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहत धोंडराई नजीकच्या पुलाजवळ आले व त्यांचा मृतदेह तिथे आढळून आला.
भोजगाव येथील ही पहिली घटना नसून याआधीही अशा घटना भोजगाव मध्ये घडलेल्या आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी वाहुन गेलेल्या पुलाची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. मात्र आजही हा पुल दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे एका दुःखातुन सावरत नाही, तोच दुसरे दुःख भोजगावकरांवर विशेषतः संत कुटुंबीयांवर आले आहे.
मयत सुदर्शन संत हे भोजगाव ग्रामपंचायत चे पाणीपुरवठा कर्मचारी होते. या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी अथवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह हलवू देणार नाही असे सांगत त्यांनी धोंडराई येथील पुलावरच ठिय्या दिला.