अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: ढासळली आहे. हे काळे कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकरी बांधव गेल्या ३०० दिवसांपेक्षा जास्त दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीच्या विरोधात काँग्रेसने 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आयोजन केले आहे.
त्याचप्रमाणे केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारने सर्वसरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन त्याचा दुरूपयोग चालविला आहे. त्याचतच भर म्हणून देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार व बंदरे ही एकेक करून विकली जात आहेत.
तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ असे म्हणणारे मोदी सरकार २१ हजार कोटीचे ड्रग्ज गुजरातमध्ये सापडूनसुध्दा गप्प आहेत. देशामध्ये सर्व अलबेल आहे, असे विकत घेतलेल्या माध्यमांमधून जनतेला दाखविले जात आहे.
या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या आंदोलनात सहभागी होत भारत बंद व महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. पुणे शहरामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात सर्व समविचारी पक्ष व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
शहरातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते, आघाडी संघटना, विविध सेल व विभागाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरामध्ये कडकडीत बंद ठेवून कोरोना साथरोगाचे नियम पाळून केंद्रातील मोदींच्या जुलमी राजवटीचा निषेध करावा असे आवाहन पुणे जिल्हा काँग्रेस पक्ष कमिटी वतीने अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.