दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे मत आमदार अॅड. राहुल कुल यांनी व्यक्त केले.
आमदार कुल यांच्या संकल्पनेतून कै. सुभाषआण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, दौंड, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व उपजिल्हा रुग्णालय, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने बोरमलनाथ मंदीर, बोरीपार्धी, चौफुला येथे नुकताच दिव्यांग मेळावा संपन्न झाला.यावेळी या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कुल यांनी आपले मत व्यक्त केले.
या मेळाव्यात पूर्णत: किंवा अंशतः शारीरिक व्यंग, अस्थिव्यंग किंवा नेञव्यंग असलेल्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सुविधा व सवलतींचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग नागरिकांची तपासणी व अपंगत्व प्रमाणपत्र (UDID कार्ड) नोंदणीसाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुमारे ३०० हून अधिक दिव्यांग बांधवानी शिबिरामध्ये सहभागी नोंदवला. १० जुलै २०२१ रोजी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना मोफत मोटाराईज ट्राय सायकल वाटप तपासणी शिबिराचे आयोजन आमदार अॅड. कुल यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
त्यामध्ये पात्र ठरलेल्या ४४ दिव्यांग बांधवाना बॅटरीवरील स्वयंचलित सायकलचे वाटप देखील लवकरच करण्यात येणार आहे, तर डिसेंबर २०२० मध्ये देखील आमदार अॅड. कुल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मेळाव्यात सुमारे ३५० हून अधिक दिव्यांगांना मोफत UDID कार्ड मिळवून देण्यात आल्याचे आमदार अॅड. कुल यांनी यावेळी सांगितले.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. दिनेश वानखडे, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. शेंडकर आदींनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुल, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक तुकाराम ताकवणे, विकास शेलार, भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड. बापू भागवत आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार कुल यांनी कोरोनासारख्या भीषण महामारीच्या काळात आमच्या सर्व दिव्यांग बांधवांना मदत केली असून, संजय गांधी निराधार योजना, बस प्रवास पास तसेच इतर अनेक शासकीय योजना, सार्वजनिक, वैयक्तिक कामे व अपंग मेळाव्याचे आयोजन करून दिव्यांग बांधवाना लाभ मिळवून दिल्याने प्रहार अपंग क्रांती संघटनेने आभार व्यक्त केले.