दिल्ली : महान्यूज लाईव्ह
कोलकात्यामधील एका इंटरनॅशनल हॉटेलमध्ये असलेल्या सलूनमध्ये महिलेचे चुकीच्या पद्धतीने केस कापल्यामुळे तिला जो मनस्ताप झाला, त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक मंचाने हॉटेलला तब्बल दोन कोटींचा दंड ठोठावला आहे.
कोलकत्ता येथील जवाहरलाल नेहरू रोडवरील आयटीसी कंपनीच्या आयटीसी हॉटेल्समध्ये हरियाणातील गुरगाव येथील आशना रॉय या महिला ग्राहक गेल्या होत्या. या हॉटेलमधील सलून मध्ये एलएएम नावाच्या हेअरड्रेसर्सशी तिने केस कापण्यासंदर्भात चर्चा केली आणि तिथे केस कापताना चुकीच्या पद्धतीने केस कापल्याचे तीचे म्हणणे होते. या ट्रीटमेंट मुळे महिलेच्या त्वचेला खाज सुटली, तसेच केस कायमचे गळून गेले अशीही तक्रार तिने केली.
यासाठी महिलेला दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागले. आशना रॉय यांचे त्यांच्या लांब केसाची भावनिक नाते होते. तसेच त्या या केसच्या संदर्भात मॉडेलींग करायच्या. हेअर प्रॉडक्टशी संबंधित जाहिरातीमध्ये त्या काम करत होत्या. चुकीच्या पद्धतीने केस कापले गेल्याने त्यांचे हे कामही आणि अनेक प्रकल्प त्यांच्या हातातून निसटले. त्यामुळे त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले.
त्यावरून या महिलेने सलूनच्या मॅनेजर जुबिन यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. यानंतर त्यांनी लक्ष दिले नाही, म्हणून आयटीसी कंपनीच्या कडे तक्रार केली. या सर्व ठिकाणी आपली दखल घेतली नाही असे या महिलेचे म्हणणे होते. ही संपूर्ण घटना 12 एप्रिल 2018 ते 3 मे 2018 पर्यंत सुरू होती. त्यानंतर या महिलेने ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला.
राष्ट्रीय ग्राहक मंचाचे अध्यक्ष न्या. आर के अग्रवाल व सदस्य डॉ. एस एम कांतीकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत मंचाने आयटीसी कंपनी ला दोन कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. ही रक्कम आठ आठवड्याच्या आत देण्याचे आदेश त्यांनी दिले.