बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेचे संपूर्ण तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात असून राष्ट्रवादीचे ही भूमिका अनाकलनीय असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तर थेट हा प्रश्न उडवून लावला.
आज अजितदादांना पत्रकारांनी विचारल्यानंतर दादांनी एका क्षणात उत्तर दिले, ‘तो आमचा विषय! आम्हाला वाटलं, आम्ही माघार घेतली.. विषय संपला.. आमच्यावर काय कुणाचे बंधन आहे का? की, पॅनेल टाकलाच पाहिजे. दादांच्या या स्फोटक उत्तराने उपस्थित सर्वांमध्ये हाशा पिकला. मात्र एकूणच इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने न उतरण्यामागे नेमकी राजकीय गणिते काय आहेत याचे वेगवेगळे आडाखे आता बांधले जाऊ लागले आहेत.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची स्थिती बिकट असल्याने अशा बिकट परिस्थितीत कारखान्याची निवडणूक लढवावी का? या विचारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळी गट व वेगळी विचारधारा होती. एकूणच कारखान्याची निवडणूक लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील केली होती व कर्मयोगी च्या कार्यक्षेत्रात भाजपा विषयी नाराजी आहे, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे देखील ठाम म्हणणे होते, परंतु अचानक निवडणुकीतून माघार घेण्यामुळे आता या निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आहे.