दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील कुसगाव येथील अभिजीत कृष्णदेव वरे (वय ३२) हे रायपुर येथे सैन्यामध्ये नोकरीस होते. ते ३ महिन्यापासून रजा घेऊन आल्यामुळे ते कुसगाव मध्ये पत्नी, मुले, आई आणि भाऊ असे एकत्रीत राहत होते. २३ सप्टेंबरच्या रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असतानाच वरे यांनी रहात्या घराच्या तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मक्ताबाई या झोपेतुन जाग्या झाल्या. अभिजीत दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध करत असताना त्यांना अभिजीत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनीजोरजोरात हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाजामुळे त्यांच्या शेजारी राहणारे अभिजीतचे चुलते संजय रामचंद्र वरे हे
धाऊन आले व त्यांनी पुतण्या अभिजीत याने
तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले.
त्यांनी तात्काळ याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना मोबाईलवरुन कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ घटना स्थळावर वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आर. झेड. कोळी, महिला पोलिस नाईक वैशाली चव्हाण, महिला पोलिस शमा माने यांना पाठवले.
पोलिसांनी अभिजीतचा लटकलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह गावकर्यांच्या मदतीने खाली घेऊन मृतदेहाचा पंचनामा करुन तो शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी मृतदेह चुलते संजय रामचंद्र वरे यांच्या ताब्यात दिला. याची खबर चुलते संजय रामचंद्र वरे राहणार कुसगाव (ता. वाई) यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली.
मृत अभिजीत वरे यांची रायपुर येथून नुकतीच आसाम येथे पोस्टींग झाली होती आणी एकदोन दिवसात ते आसामला रवाना होण्यासाठी सर्व साहित्य बांधून ठेवले होते. असे असताना ही आकस्मात घटना का घडली असावी? याचा शोध वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे हे घेत आहेत. अभिजीत हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. तरुण वयातच त्याने मृत्यूला कवटाळल्याने कुसगावावर शोककळा पसरली आहे.