बारामती : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाने दुधातील भेसळ केल्याबद्दल खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र या केंद्रा विरोधात बारामती मध्ये गुन्हा दाखल केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली. ही घटना आठ जुलै रोजी घडली असली, तरी त्याचा अहवाल 21 सप्टेंबर 2021 रोजी आला असल्याने वैभव दत्तात्रय जमकावळे व संपत भगवान ननावरे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राने खर्डा येथून बारामती येथे दूध पाठवले होते अन्न आणि औषध प्रशासन खात्याला याबाबत संशय आल्याने त्यांनी टॅंकर (क्रमांक एम एच 11 ए एल 59 62) थांबवला. तेथील दुधाचा नमुना विश्लेषणासाठी पाठवला व भेसळीचा संशय असल्याने या टँकरमधील आठ हजार लिटर दूध नष्ट केले. त्यावेळीच बारामती तालुका पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दुधाच्या विश्लेषणाचा अहवाल नुकताच अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाला असून यामध्ये कपडे धुण्याच्या पावडरचा व ग्लुकोजचा समावेश करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात जमकावळे व ननावरे यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील कलमांचे उल्लंघन केल्यावरून फिर्याद दिली. दरम्यान या प्रकरणी जमकावळे व ननवरे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने तीन पोलिस दिवसांची कोठडी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.