संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील जांबुल ग्रामपंचायत अंतर्गत येणारी शिंदेवाडीची गेल्या २० वर्षा पासून मूलभूत सुविधांपासून सुरू असलेली वंचना आता संपुष्टात येणार आहे. आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून येथे सर्व सुविधा मिळणार आहेत.
या गावातील नागरिकांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा मिळत नव्हत्या. त्यामध्ये वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही, पिण्यासाठी पाणी नाही, गावात घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, वीजेची व्यवस्था नाही, तसेच वस्तीवरील लहान मुलांना शाळा नाही, अंगणवाडी नाही, त्यामुळे वस्तीवरील नागरिक हे त्रस्त झाले होते.
दोन दिवसांपूर्वी वस्तीवरील नागरिक हे मतदार संघाचे आमदार व पंचायत राज समितीचे अध्यक्ष डॉ संजय रायमूलकर यांच्याकडे त्यांच्या व्यथा घेऊन गेले सर्व हकीकत सांगितली. आमदार डॉ संजय रायमूलकर हे मुंबईला २ दिवसासाठी गेले होते.
ते सकाळी परतताच त्यांनी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी यांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शासन आपल्या दारी मधून त्या गावात जाण्यासाठी मुंबईवरून परतताच जांबुल येथे दिनांक २४ सप्टेंबर ला दाखल झाले. परंतु त्या दिवशी जांबुल वरून शिंदे वाडीला जाण्यासाठी चिखलातून २ किमी जावे लागत होते. आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना ट्रॅक्टरवर बसून सर्व रस्त्याची पाहणी करत वस्ती वरती पोहचले.
त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, शिवपाटील तेजनकर शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, पैनगंगा सूतगिरणीचे उपाध्यक्ष हिमतराव सानप, युवा सेना तालुकाप्रमुख उपसरपंच गजानन मापारी, नायब तहसीलदार हेमंत पाटील, गटविकास अधिकारी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाघ, कृषी सहायक जितेंद्र सानप आदी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी आमदार डॉ संजय रायमूलकर वस्तीवर दाखल होताच सर्व वस्ती वरच्या महिला पुरुष व लहान मुलांनी आमदार साहेब आम्ही हाक दिली व आपण आम्हाला साथ दिली असे सांगितले.
या वेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा बळीराम मापारी म्हणाले की, या शिंदेवाडी वस्तीच्या समस्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ संजय रायमूलकर हे सोडवतील.
यानंतर पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ संजय रायमूलकर बोलताना म्हणाले की, शिंदेवाडी येथील लोक माझ्याकडे गावातील समस्या घेऊन आले. त्यांना मी शब्द दिला की येत्या दोन दिवसात मी स्वतः सर्व अधिकारी यांना घेऊन वस्तीवर येऊन आपल्या समस्या निकाली काढेन.
वस्तीवरच्या नागरिकांची रस्त्याची समस्या डी पी डी सी च्या अंतर्गत पालकमंत्री पाणंदरस्त्यामध्ये टाकून मतदार संघातील पहिला रस्ता हा केल्या जाईल. वीजेची समस्या मी स्वतः आमदार निधी मधून येत्या काही दिवसातच पूर्ण करील. वस्तीवरील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंच्यात मधून १५ वित्त आयोगातून विहिरीवरून पाईपलाईन करून आर ओ प्लॅंट बसवण्यात येईल. तसेच गावातील तरुण मुलांना खुली व्यायाम शाळा देण्यात येईल
वस्तीवर सभामंडप, गावात ४ थीपर्यंत शाळा, घरकुल योजनेचा लाभ, अंतर्गत रस्ते सुद्धा लवकरच पूर्ण करू. इतक्या वर्षा पासून जो त्रास सहन केला आहे, तो लवकरच संपवनार असा मी शब्द देतो असे या वेळी आमदार डॉ संजय रायमुकलर म्हणाले.
लहान मुलांनी यावेळी आमदार डॉ. रायमूलकर यांना आम्हाला २ किमी पायी शाळेत जावे लागते. अनेक वेळा जंगली प्राणी हे आम्हाला दिसतात, तसेच रस्त्यात पावसाळ्यात ओढ्याला पूर असल्यासने आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आमच्या वस्तीवरच शाळा सुरू करावी अशी मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेऊन लवकरच शाळा सुरू करू असा शब्द आमदारांनी चिमुकल्यांना दिला.